देसाई यांची टीका
पुणे : महाविकास आघाडी सरकारचे एक वर्ष पूर्ण झाले आहे, आणखी चार वर्षे बाकी आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आता राजकीय स्थित्यंतराची स्वप्नेच बघावी लागतील. असे अंदाज व्यक्त करण्याशिवाय आता त्यांच्या हातात काही नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी पुण्यात टोला हाणला.
सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी देसाई आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात राजकीय स्थित्यंतराचा अंदाज व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर देसाई यांना प्रश्न विचारण्यात आला होता. देसाई म्हणाले, की महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार आता स्थिर झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांची मुदत पूर्ण करणार याची खात्री आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात नाराजी नसल्याचेही देसाई यांनी सांगितले.
टेस्ला व्यवस्थापनासह उत्पादन प्रकल्पाबाबत चर्चा
टेस्ला प्रकल्प कर्नाटकात गेल्याबाबत गैरसमज निर्माण होतो आहे. मात्र ते तसे नाही. टेस्ला कर्नाटकात कार्यालय आणि दालन सुरू करत आहे. असेच कार्यालय आणि दालन ते मुंबईतही सुरू करणार आहेत. भारतात उत्पादन सुरू करण्यापूर्वी त्यांच्या मोटारींपैकी कोणत्या मोटारीला भारतात प्रतिसाद मिळतो याचा अंदाज घेण्यासाठी आधी ते मोटारींची विक्री करणार आहेत. त्यानंतर कोणत्या मोटारीचे भारतीय बाजारपेठेसाठी उत्पादन करायचे, उत्पादन केंद्र कु ठे उभारायचे याचा ते विचार करतील. त्यामुळे कारखान्याचा निर्णय झालेला नाही.