महाखादी विक्री आणि प्रोत्साहन केंद्राचे उद्घाटन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण अर्थकारण सक्षम करायचे असेल तर तेथे असलेल्या कौशल्यांना आणि कारागिरांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे गांधीजी सांगत असत. महाखादी हा ‘ब्रँड’ म्हणून विकसित व्हावा आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या राज्यातील पहिल्या महाखादी विक्री आणि प्रोत्साहन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री प्रवीण पोटे, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचा बागला यांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले,‘ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक प्रकारच्या कला-कौशल्यांमध्ये पारंगत असलेले कारागीर आहेत. कारागिरांच्या कामाचे उत्तम ‘ब्रँडिंग’ केल्यास त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणे शक्य आहे. मात्र त्यासाठी पारंपरिक कलाप्रकारांना आधुनिकीकरणाची जोड देण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून ते काम केले जाईल. खादीला पूर्वी फक्त राजकारण्यांचा पेहराव अशी ओळख होती, मात्र आता खादी हे ‘स्टेटस सिम्बॉल’ ठरत आहे.’

सुभाष देसाई म्हणाले,‘ खादीला ऊर्जितावस्था यायला हवी असेल तर महाखादी विक्री केंद्र प्रत्येक जिल्ह्य़ाच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल.’

विशाल चोरडिया म्हणाले,‘ खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची जबाबदारी घेतल्यानंतर राज्यभर दौरा केला असता सर्वोत्तम कारागीर आपल्या ग्रामीण भागात असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या कलेला योग्य बाजारपेठ न मिळाल्यास ते कलाप्रकार लोप पावतील. हे होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’ खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या ‘महाखादी’ विशेषांकाचे प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आले.

शिरोळे यांचा आदर्श घ्या

राज्यातील पहिल्या महाखादी विक्री आणि प्रोत्साहन केंद्रासाठी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी खासदार निधीमधून पहिली मदत केली. त्यातून उभे राहिलेले हे केंद्र खादीच्या प्रसारात मोठे योगदान देणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी या साहाय्याबद्दल शिरोळे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिरोळे यांचे कौतुक केले. तसेच राज्यातील सर्व खासदारांनी अनिल शिरोळे यांचा आदर्श घेत आपल्या परिसरात असे केंद्र सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे पत्र देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

कुठे आहे?

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे  राज्यातील पहिले महाखादी विक्री आणि प्रोत्साहन केंद्र पुण्याच्या शिवाजीनगर भागामध्ये सुरू करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालयाच्या आवारातील हातकागद संस्थेमध्ये हे केंद्र असून तेथे खादी आणि इतर हस्तकौशल्याच्या वस्तूंची विक्री होणार आहे.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis to inaugurate maha khadi outlet in pune
First published on: 17-11-2017 at 03:18 IST