राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने त्यांच्यावरील तक्रार मागे घेतली. काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर भाजपा नेत्यांनी धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. पण अखेर रेणू शर्मा हिने थेट तक्रारच मागे घेतली. या मुद्द्यावर विविध नेतेमंडळी प्रतिक्रिया देत आहेत. नुकतीच या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मा यांनी मागे घेतली बलात्काराची तक्रार

“धनंजय मुंडे यांच्याबाबत जे काही घडलं होतं त्यामध्ये आम्ही त्यांना पाठीशी घालत आहोत असे आमच्यावर आरोप झाले. आम्ही संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या, असं म्हणत होतो. यात धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली. आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागला. ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली. त्यांना आता उत्तर मिळालं असेल. बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी नेता बदनाम होतो. अशा वेळी त्याचे कुटुंबही व्यथित होते. अशा चुकीच्या गोष्टींना जबाबदार कोण? अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा त्या नेत्याला एक क्षणात पायउतार व्हावं लागतं, याचा जरा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे”, असं रोखठोक मत अजित पवार यांनी मांडलं.

धनंजय मुंडे प्रकरण: मी आधीच सांगितलं होतं… शरद पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. “आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज आहे, असं मी आधीच म्हटलं होतं. सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झालय” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.