पुणे महापालिकेचा चालू आर्थिक वर्षांचा ताळेबंद बिघडल्याबद्दल सातत्याने ज्या तक्रारी केल्या जात होत्या त्या खऱ्या ठरल्या असून यंदाचे आर्थिक वर्ष संपताना उत्पन्नापेक्षा किमान ३०० कोटींचा जादा खर्च महापालिकेने केलेला असेल. त्यामुळे उत्पन्नाच्याच प्रमाणात यंदा खर्च होईल असा जो दावा प्रशासनाकडून केला जात होता तोही फोल ठरला आहे.
महापालिकेचे आर्थिक वर्ष संपायला दोन आठवडे शिल्लक असताना अनेक विकासकामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिले जात आहेत. ज्या कामांचे आदेश दिले जात आहेत ती कामे खरोखरच सुरू केली जाणार आहेत का आणि ती पूर्ण होणार आहेत का असा प्रश्न महापालिकेत उपस्थित झाला असून त्या निमित्ताने आर्थिक परिस्थितीचा ताळेबंद मागण्यात आला होता. या ताळेबंदातून महापालिकेचे चालू आर्थिक वर्षांतील उत्पन्न खर्चापेक्षा ३०० कोटींनी कमी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपताना ३३०० कोटी रुपयांपर्यंत खर्च होईल आणि महापालिकेची जमा ३००० कोटींपर्यंत असेल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च २०१४ रोजी विविध कामांची ४,९७६ बिले महापालिकेकडे सादर झाली होती. यंदाही अशाच पद्धतीने शेवटच्या टप्प्यात ४०० कोटींची बिले सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्न व खर्च यातील तफावत आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक जानेवारी महिन्यात स्थायी समितीला सादर केले होते. तोपर्यंत महापालिकेचे उत्पन्न २,६०० कोटी झाले होते आणि मार्च अखेर ते ३२०० कोटींवर जाईल, असा अंदाज होता. स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी), मिळकत कर आणि बांधकाम विकास शुल्क हे महापालिकेच्या उत्पन्नाचे तीन प्रमुख स्रोत आहेत. तसेच नेहरू योजना, राज्य शासनाकडून अनुदान आणि महापालिकेने घेतलेले कर्ज याही जमेच्या प्रमुख बाबी आहेत. या तीन बाबींमधून ४४५ कोटींची जमा अपेक्षित होती. जमा-खर्चाचा विचार करता आलेला फरक आणि शेवटच्या टप्प्यात बिले सादर झाल्यानंतर होणारी देय रक्कम यांचा विचार करता अंदाजपत्रकातील फरक ३०० कोटींच्याही पुढे जाणार असल्याची चर्चा आहे. महापालिका आयुक्तांनी यंदा ३,९९७ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले होते. स्थायी समितीने त्यात ४८२ कोटींची वाढ केली असून अंदाजपत्रक ४४७९ कोटी रुपयांचे झाले आहे.