उतारे अचूक करताना प्रशासनाच्या नाकीनऊ

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे जिल्ह्य़ात १४ लाख ९१ हजार ८५२ सातबारा उतारे डिजिटल स्वरूपात करण्यात आले आहेत. त्यापैकी ३० हजार ९५९ उताऱ्यांमध्ये विसंगती निदर्शनास आली आहे. एकाच उताऱ्यावर अनेक जणांची नावे असणे, तुकडाबंदी कायदा असतानाही एक-दोन गुंठय़ांच्या जमिनी गुंतवणूकदारांना विकणे अशा विविध कारणांमुळे डिजिटल सातबारा उतारे अचूक करताना जिल्हा प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत.

सातबारा उतारा हा ग्रामीण भागातील व शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे. कर्ज, सरकारी योजना अशा विविध कारणांसाठी हा उतारा आवश्यक असतो. हा उतारा देणाऱ्या तलाठय़ाच्या मागे हेलपाटे मारण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसतो. त्यामुळे डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाने के लेल्या घोषणेनुसार १ मे २०१८ पासून डिजिटल उतारे देण्याची योजना सुरू के ली आहे.

दरम्यान, दोन वर्तुळाकार रस्ते, नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्पांचे होणारे विस्तारीकरण अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जिल्ह्य़ातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्याचा फायदा घेत रिअल इस्टेट व्यवसायातील दलालांनी स्थानिकांना पैशांचे आमिष दाखवून एक-दोन गुंठय़ांच्या जमिनी गुंतवणूकदारांना विकल्या आहेत. परिणामी संगणकीकृत सातबाराच्या तपासणीमध्ये जिल्ह्य़ातील हवेली, जुन्नर, खेड तालुक्यांमधील एका सातबारा उताऱ्यावर १०० पेक्षा अधिक खातेदारांची नावे असल्याचे समोर आले आहे.

तुकडाबंदी कायद्यामुळे एक किं वा दोन गुंठे जागा विकता येत नाही. मात्र, तरीदेखील शहरालगतच्या गावांमध्ये जमिनींचे तुकडे करून मोठय़ा प्रमाणात विकण्यात आले आहेत. परिणामी सातबारा संगणकीकरणाचे काम जिल्ह्य़ात संथगतीने सुरू आहे.

विसंगती दूर करण्याचे काम सुरू

ई-फे रफार प्रकल्पांतर्गत संगणकीकृत के लेला सातबारा उतारा अचूक करण्यात येत आहे. त्यासाठी महसूल विभागाने आज्ञावलीमध्ये अनेक सुधारणा करून विदासंचातील (डाटाबेस) विसंगती दूर करण्यासाठी अनेक अहवाल उपलब्ध करून दिले आहेत. हे अहवाल निरंक करण्यासाठी तलाठी मंडल अधिकारी यांनी जुने अभिलेख तपासून व तहसीलदारांकडून महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम १५५ अन्वये प्राप्त अधिकारात तांत्रिक, लेखनाच्या चुका दुरूस्त के ल्या जात आहेत. गेल्या १००-१२५ वर्षांत हस्तलिखित सातबारा उताऱ्यात झालेल्या चुका डिजिटल सातबारा अंतर्गत दुरूस्त करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्य़ात १४ लाख ९१ हजार ८५२ डिजिटल सातबारा उतारे असून त्यापैकी ३० हजार ९५९ उताऱ्यांमध्ये विसंगती आहे. ही विसंगती दूर करून सर्व उतारे अचूक करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती ई-फे रफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.