राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारानंतर आता जमिनीचा खाते उतारा देखील (गाव नमुना क्र. आठ-अ) डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. महसूल दिनापासून (१ ऑगस्ट) ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिणामी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही.

महसूल विभागाच्या महाभूमी प्रकल्पांतर्गत ई-फे रफार कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा (गाव नमुना क्र. आठ-अ) ही आणखी एक नवी सुविधा १ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा प्रारंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महसूल दिनाचे औचित्य साधत १ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.

महाभूमी संके तस्थळावर संगणकीकृत अभिलेखांपैकी फक्त सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीने नागरिकांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होता. आता त्याबरोबरच डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारादेखील मिळणार आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीककर्ज  किं वा जमीन खरेदी-विक्रीसाठी सातबारा उताऱ्यासोबत खाते उतारा देखील आवश्यक असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ई-फे रफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

महसूल विभाग दरवर्षी १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करतो. यंदा करोनामुळे महसूल दिन साध्या पद्धतीने व सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्याच्या सूचना अपर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर यांनी दिल्या होत्या. खाते उतारा डिजिटल स्वाक्षरीत देण्याच्या सुविधेचा प्रारंभ देखील ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला, असेही जगताप यांनी सांगितले.

‘महाभूमी’ हे मोबाइल अ‍ॅप लवकरच

विविध सुविधा ऑनलाइन करण्यावर महसूल विभागाने भर दिला आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा देखील विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, या सर्व सुविधांसाठी महाभूमी संकेतस्थळावर जावे लागते. त्यासाठी प्रत्येकाकडे संगणक किंवा लॅपटॉप असेल, असे नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी महसूल विभागाने स्वत:चे ‘महाभूमी’ हे मोबाइल अ‍ॅप तयार करायचा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून या सुविधा आता नागरिकांना घरबसल्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महसूल विभागाकडून तयार करण्यात येत असलेले अ‍ॅप प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील सहा तालुक्यांमध्ये टेस्टिंगसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ातील खेड तालुक्याचा समावेश आहे. या चाचणी आवृत्तीमधील त्रुटी दूर करून लवकरच हे मोबाइल अ‍ॅप सर्वासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विनास्वाक्षरित सातबाराची माहिती पाहण्यासाठी संगणकाची गरज नाही. १५ रुपये शुल्क भरून डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा मिळेल. सातबारा उताऱ्यावरील क्युआर कोड स्कॅ न करून काही क्षणात त्याची पडताळणी करता येणे शक्य आहे.

भूमी अभिलेख विभागाने विविध सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक सुविधा ऑनलाइन मिळाल्यास नागरिकांना तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही. घरबसल्यासुद्धा नागरिकांना सुविधा मिळायला हवी, अशी शासनाची भूमिका आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उताऱ्यानंतर आता खाते उताराही ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.

– रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प