आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहू मधुन जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. या दोन्ही पालख्यांचे सायंकाळी पुणे शहारात आगमन झाले तेव्हा, माऊलींच्या दर्शनासाठी वारी मार्गाच्या दुतर्फा पुणेकरांनी गर्दी केली होती. या वारीत नाशिक येथील आधारतीर्थ आश्रमातील राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांची दिंडी देखील सहभागी झाली आहे. बळीराजाला सुखी कर, असे विठुरायाला साकड घालण्यासाठी या मुलांची दिंडी वारीत सहभागी झाली आहे.

या मुलांच्या दिंडीमध्ये सहभागी झालेली जळगाव येथील आकांक्षा पवार ही दहावीमध्ये असुन तिला गायिका व्हायचे असल्याचे तिने लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. आकांक्षा म्हणाली की, मी लहान असताना वडिलांनी पीक कर्ज घेतले होते. पण पावसाने पाठ फिरवल्याने सगळेच गणित बिघडले. त्यामुळे घेतलेल्या कर्जाने घेतलेल्या पैशांचे वडील सतत व्याज भरत राहिले. मात्र, काही महिन्यानी त्यांना व्याज भरणे शक्य झाले नाही. परिणामी यातुन आलेला तणाव असह्य झाल्याने त्यांनी विहिरीत उडू मारून आत्महत्या केली. त्यानंतर काही महिन्यांनी आईने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडील नसल्याने मी पोरकी झाले. त्यानंतर मला नाशिक येथील या संस्थेत दाखल करण्यात आले. आता मी दहावीमध्ये असुन खुप शिकणार आहे. शिवाय मला गायिका देखील व्हायचे आहे.

तसेच ती पुढे म्हणाली की, माझ्या आई-वडिलांनी आत्महत्या केली. त्यामुळे मी पोरकी झाली आहे. मला त्यांची खुप आठवण येते. मात्र माझ्या मनातील भावना कोणालाही सांगू शकत नाही. हे सांगताना तिचा कंठ दाटून आला होता. आमची अवस्था पाहून तरी राज्यातील शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये. पुढच्या संघर्षांसाठी तयार राहण्याचे आव्हान तिने शेतकऱ्यांना केले. तर आता तरी शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांर्भियाने लक्ष द्यावे, मागणी देखील तिने यावेळी मागणी केली.

राज्यात दुष्काळामुळे शेतकर्‍यांचे आत्महत्या करण्याचे सत्र सुरू आहे. घरातील करत्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर त्याचा परिणाम घरातील प्रत्येक मंडळींवर होतो. यामध्ये प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर परवड होते आणि शाळेच्या ऐवजी शेतामध्ये कामावर जाण्याची वेळ अनेकांवर येते. अशाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी नाशिक येथील आधारतीर्थ आश्रम ही संस्था मागील आठ वर्षांपासून काम करत आहे. या संस्थेत राज्यातील ३० जिल्ह्यातील २५ मुले आणि २५ मुली शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्षी या आश्रमातील मुलांचा वारीमध्ये सहभाग असतो.