लोकसत्ताच्या बदलता महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत आजपासून दोन दिवस सामाजिक चळवळींचा बदलता चेहरा या मुख्य संकल्पनेवर आधारित विविध सामाजिक-राजकीय प्रश्नांवर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असला तरी, दोन दिवस होणारी ही चर्चा ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून (संकेतस्थळासह) आमच्या लाखो वाचकांपर्यंत पोहोचणार आहे.
गेल्या ५४ वर्षांत महाराष्ट्र खूप बदलला. शेतीपासून उद्योगांपर्यंत आणि गावांपासून शहरांपर्यंत अनेक बाबतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. जागतिकीकरण आणि नवजीवनशैलीचे बोट धरून काळानुरूप पावले टाकण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. मात्र, त्याचवेळी खर्डा-खैरलांजी, शक्ती मिलसारख्या घटनांमधून जुनाट-रोगट मानसिकतेचेही दर्शन घडत आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील विषम समाजरचन बदलण्यासाठी अनेक विचारप्रवाह आपापल्या परीने काम करत आहेत. तर दुसरीकडे आजही समाजात धर्माचे वर्चस्व कायम आहे. कुणाला वाटते धर्म कायम ठेवून विषमता नष्ट करावी. काहींना विषमतेचे अधिष्ठान असलेली धर्म संकल्पनाच संपवायची आहे. एका बाजूला जातीअंताच्या चळवळी आणि दुसऱ्या बाजूला जातीवर आधारित आरक्षणाच्या रक्षणाच्याही चळवळी सुरू आहेत. तीच गोष्ट श्रद्धेची. श्रद्धा ईश्वराशी आणि  ईश्वर धर्माशी निगडित म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला श्रद्धावादींचा विरोध होतोय. तर मनाचा थरकाप उडवणाऱ्या अंधश्रद्धेच्या घटनांनी समाज कासावीस होतोय.
महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्राचे अर्थकारण बदलतेय, पण समाज बदलतोय का, बदलत असेल तर त्या बदलाची दिशा कोणती, या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध ‘बदलता महाराष्ट्र’च्या व्यासपीठावरून पुढील दोन दिवस घेतला जाणार आहे. विविध विचारप्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारे अभ्यासू, व्यासंगी आणि कृतिशील विचारवंत या दोन दिवसांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. पुणे येथे सामाजिक प्रश्नांवर होणारे विचारमंथन आम्ही लोकसत्ताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविणार आहोत.
चर्चासत्रे आणि सहभागी होणारे वक्ते
*श्रद्धा आणि अंधश्रद्धा
वक्ते- अविनाश पाटील, अभय वर्तक, शरद बेडेकर.
*धर्मसुधारणा आणि आजची आव्हाने
वक्ते – बिशप थॉमस डाबरे, प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, कुमार सप्तर्षी.
 *जातीअंताचा मार्ग कोणता?
वक्ते- प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. शं. ना. नवलगुंदकर, कॉ. गोविंद पानसरे.
*वारकरी चळवळ आणि सामाजिक वास्तव
वक्ते- अभय टिळक, डॉ. भारत पाटणकर, डॉ. सदानंद मोरे.
*समता की समरसता?
वक्ते- डॉ. बाबा आढाव, भिकूजी इदाते, डॉ. रावसाहेब कसबे.
*सामाजिक मुद्दय़ांचा राजकारणावरील परिणाम
वक्ते- प्रकाश पवार, विनय सहस्रबुद्धे, सुहास पळशीकर.