मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज शिवनेरीवर

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवनेरी किल्ल्यावर श्री शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे.

शिवनेरी किल्ल्यावर श्री शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन सार्वजनिक स्वच्छतागृहे, वीज, पाणी आणि आरोग्य आदी सुविधा पुरवण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.

गडावर होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम लक्षात घेऊन जुन्नर ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा करणारे टँकर, वैद्यकीय सेवांतर्गत रुग्णवाहिका, औषध पुरवठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले. शिवजयंतीनिमित्त गेल्या चार दिवसांपासून जुन्नर नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने विविध कार्यक्रम सुरू आहेत.

दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवनेरी गडावर होणाऱ्या शिवजयंती महोत्सवाला राज्य शासनाकडून दिला जाणारा निधी कमी पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी गेल्याच महिन्यात आढावा बैठक घेऊन निधीची निश्चिती केली होती. जिल्हा परिषदेकडून दहा लाख रुपये, जुन्नर नगरपालिका पाच लाख रुपये, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती पाच लाख रुाये आणि दूध संघ, पुणे यांनी पाच लाख रुपये देण्याचे आदेश देत, दरवर्षी याच संस्था याचप्रमाणे महोत्सवासाठी निधी देतील, असे पवार यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार निधी देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांकडून घोषणेची शक्यता

शिवजयंती महोत्सवासाठी शिवनेरी विकास आराखडय़ांतर्गत शिवनेरी परिसराचा विकास करण्यात येणार आहे. गेल्या सरकारपुढे त्याबाबत ८८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. शिवनेरी विकासासाठी पुरातत्त्व विभाग, वनविभागाने चांगल्या प्रकारचा प्रस्ताव दिल्यास परवानगी देऊ, अशी ग्वाही सरकारने दिली आहे. रायगडावर रोप वे करण्यात आला आहे. कारण गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. शिवनेरीची तशी परिस्थिती नाही. चालत खाली आल्यानंतर काही भाग पाहण्यासारखा आहे. त्यामुळे शिवनेरीच्या पायथ्याशीच संग्रहालयासारखे काही करता येईल किंवा कसे, याबाबत आणि रोप वेबाबत चाचपणी करण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरी परिसर विकास योजनेबाबत घोषणा करतील अशी शक्यता आहे.