दिवाळीला मूळ गावी जाण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून शहरातील एसटी स्थानके व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यात चोरटय़ांचाही वावर वाढल्याचे दिसून येत आहे. छोटय़ा-मोठय़ा रकमेच्या चोऱ्या व बॅग पळविण्याच्या घटना या काळात घडल्या आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरी केली जात असल्याने प्रवाशांनी याबाबत दक्ष राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली असल्याने चोरटय़ांचा वावर लक्षात घेता रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस व शहरातील एसटी स्थानकांवर शहर पोलीस दलाच्या वतीने गस्त वाढविण्यात आली आहे. संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र, याही स्थितीमध्ये स्थानकात चोरी व चोरीच्या प्रयत्नाच्या घटना घडत आहेत. स्थानकाबरोबरच प्रवासाच्या काळातही प्रवाशांच्या साहित्याच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी पुण्यातून शिरूरकडे एसटी बसने जात असलेल्या एका महिलेची पर्स कापून चोरटय़ांनी त्यातील सुमारे लाखभर रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
शहरातील एसटी स्थानकांवर पाकीटमारी, खिसा कापणे, बॅग पळवून नेण्याच्या घटना गर्दीच्या काळामध्ये घडत आहेत. चोरीची रक्कम किरकोळ असल्यास किंवा संबंधिताला पुण्यात थांबण्यास वेळ नसल्यास स्थानकावरील या घटनांबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या जात नाहीत. त्यामुळे या घटना पुढे येत नाहीत. शिवाजीनगर एसटी स्थानकामध्ये रविवारी दुपारी पुणे-लातूर गाडीत प्रवासी चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटय़ाने एका प्रवाशाचा खिशा कापला. त्यात पन्नास हजारांहून अधिक रक्कम होती. या प्रवाशाने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. त्या वेळी शिवाजीनगर डेपोतील एका चालकाने दक्षता दाखवत चोराला पकडले व त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. गर्दीच्या काळात चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असली, तरी प्रवाशांनी दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.