विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांची टीका

स्मार्ट सिटी अभियानात ‘सकाळ’ने घेतलेल्या भूमिकेबाबत आम्हाला संशय असून नोंदणीकृत कंपनी असलेल्या संस्थेने स्वयंसेवी संस्था म्हणून या अभियानात सहभागी होणे गैर आहे. ‘सकाळ’सह अशा संस्थांनी एकतर स्वयंसेवी संस्था म्हणून या शहराची सेवाभावी वृत्तीने सेवा करावी नाही तर सरळ धंदा करावा, अशा शब्दांत महापालिकेतील विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी पालिका सभेत सोमवारी ‘सकाळ’वर कडक टीका केली. या मुद्याबाबत अनेक नगरसेवकांनीही शिंदे यांच्या टीकेला साथ दिली. नगरसेवकांना उद्देशून ‘सकाळ’ने ‘नाठाळ’ शब्दप्रयोग केल्याबद्दलही सभेत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.
पुणे स्मार्ट सिटीच्या आराखडय़ाला मंजुरी देण्यासाठी महापालिकेची सभा सोमवारी बोलावण्यात आली होती. सभेत शहराचा स्मार्ट सिटी आराखडा एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र पावणेतेरा तास चाललेल्या सभेत अनेक नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला, वीस कंपन्यांना आणि ‘सकाळ’ला टीकेचे लक्ष्य केले.
विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे सभेत म्हणाले की, स्मार्ट सिटी अभियानात स्वयंसेवी संस्था म्हणून वीस संस्थांबरोबर महापालिकेने सामंजस्य करार केले आहेत. प्रत्यक्षात त्यातील अनेक संस्था या स्वयंसेवी संस्था नाहीत, तर त्या नोंदणीकृत कंपन्या आहेत आणि महापालिका प्रशासनाने त्यांच्याबरोबर परस्पर सामंजस्य करारही केले आहेत. ‘सकाळ’ परिवारातील ‘डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन’ बरोबर देखील महापालिकेने सामंजस्य करार केला आहे. ही नोंदणीकृत कंपनी आहे. प्रत्यक्ष आराखडा राबवताना पुन्हा याच कंपन्या निविदा प्रक्रियेत येतील, अशी भीती आम्हाला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी एकतर त्यांचा धंदा करावा नाहीतर स्वयंसेवी संस्था म्हणून शहरासाठी काम करावे.
वास्तविक आम्ही स्मार्ट सिटी आराखडय़ाला विरोध केला नव्हता, तर काही प्रश्न उपस्थित केले होते. काही आक्षेप घेतले होते आणि विषय फक्त पुढच्या सभेत घेतला होता. मात्र आम्ही आक्षेप घेतल्याबरोबर ‘सकाळ’ने सगळ्या नगरसेवकांना उद्देशून ‘नाठाळ’ शब्दप्रयोग केला. नाठाळचा अर्थ माजलेला, मदमस्त झालेला घोडा. मारून मारून त्याची मस्ती उतरवायची असते. अर्थात आमच्यासाठी असा शब्दप्रयोग केला गेला असला, तरी आम्ही ज्या संस्कारात वाढलो त्यातून आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी असे शब्दप्रयोग वापरणार नाही. मात्र आम्ही देखील तळागाळात, झोपडपट्टय़ांमध्ये काम करतो. शब्दांची परतफेडच करायची वेळ आली तर मात्र आमचे शब्द चांगलेच झोंबतील, हे लक्षात ठेवा, असेही शिंदे म्हणाले. नगरसेवकांविषयी जो नाठाळ शब्द वापरण्यात आला त्याबाबत सभागृहनेता शंकर केमसे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आम्ही लोकांमधून मते मिळवून निवडून येतो, हे आमच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही स्वयंसेवी संस्था आणि कंपन्या यांच्या कारभाराबाबत सभेत अनेक आक्षेप उपस्थित केले. या कंपन्यांनी स्मार्ट सिटीचा आराखडा मंजूर होण्याआधीच परदेशातील काही कंपन्यांबरोबर करार केले आहेत. विशेष म्हणजे ९ डिसेंबर रोजी स्मार्ट सिटीची सभा तहकूब झाल्यानंतर तेलअवीव मधील वृत्तपत्रात करार झाल्याच्या बातम्या १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या. म्हणजे परदेशातील ज्या ‘सिटी’ स्मार्ट झाल्या आहेत तेथील कंपन्या पुण्याकडे एक बाजारपेठ म्हणून पाहात आहेत, हेच सिद्ध होते. मग या कंपन्या स्वयंसेवी संस्था कशा, यांना नक्की कशात रस आहे, असा प्रश्न डॉ. धेंडे यांनी उपस्थित केला.