श्रीराम ओक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यकीय व्यवसाय करीत असताना व्यवसायाव्यतिरिक्तही रुग्णसेवेलाच प्राधान्य देत आपल्या दिनक्रमाची सुयोग्य आखणी करीत समाजासाठी वेळ देणारे डॉ. शैलेंद्र मोघे. व्यवसायाला अनुसरून विविध समाजोपयोगी कार्य करीत असताना समाजातील विविध घटकांना, मित्रांनाही कार्यात सहभागी करून घेण्याचा त्यांचा स्वभाव. त्याला दाद देत समाजही सतत त्यांच्या पाठीशी. आरोग्यसेवा करणाऱ्या तळमळीच्या या डॉक्टरांची कार्यपद्धती थोडीशी वेगळीच.

वेळ नाही ही सबब अनेकानेक बाबतीत आपण अगदी सहजतेने पुढे करतो. तुमच्या-आमच्या भल्याच्या आड येणारी ही सबब समाजाच्या तसेच सामाजिक कार्याच्याही आड येते. पण अर्थातच या गोष्टीला काही अपवाद नक्कीच असतात. ही अपादात्मक भेटणारी मंडळी पहाटे लवकर उठून, कामाचे तास वाढवून  वैयक्तिक भल्यासाठी तसेच सामाजिक कार्यासाठी आवश्यक कार्याचीही सुरुवात करतात. काही मंडळी आपल्या व्यवसायाचा, विश्रांतीचा वेळ यांची सुयोग्य सांगड घालीत सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहतात. अशाच प्रकारे कार्य करणारी व्यक्ती म्हणजे डॉ. शैलेंद्र शंकर मोघे.

समाजप्रियता लाभलेले तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे डॉ. मोघे यांनी आपल्या धकाधकीच्या वैद्यकीय व्यवसायात असूनही आपल्या ज्ञानाचा वापर समाजाला व्हावा म्हणून आपल्या दैनंदिन व्यापातून काही तास, दिवस तर काही महिने देखील समाजासाठी देतात. हा वेळ देत असताना त्यांनी कोणताही अहंकार जसा बाळगला नाही तसेच प्रसिद्धीचा हव्यासही कधी ठेवला नाही. ‘हे सर्व मी माझ्या समाधानासाठी करतो,’ असे डॉक्टर अगदी मोकळेपणाने सांगतात. त्यांच्या सामाजिक कार्याचे व्रत त्यांनी स्वत:चा वेळ आणि प्रसंगी पैसा देऊन देखील समर्थपणे पेललेच. पण त्याबरोबरच आपल्याच व्यवसायातील मित्रांनाही त्यांनी प्रोत्साहित केले. वेळ सत्कारणी लावणे म्हणजे काय हे शिकण्यापासून, समाजासाठी वेळ द्यायचा म्हणजे काय करायचे हे देखील डॉ. मोघे यांच्याशी सहजतेने गप्पा मारताना लक्षात येते. उत्साहाचा झरा आणि सहजतेने लोकांमध्ये मिसळून काम करण्याची हातोटी असणारे असे हे डॉक्टर रुग्णांमध्ये जसे नावाजले गेले आहेत, तसेच ते सामाजिक क्षेत्रातही त्यांच्या कार्यामुळे ओळखले जातात.

शेती, फलोत्पादन (हॉर्टिकल्चर), ट्रेकिंगचा छंद जोपासणाऱ्या डॉ. मोघे यांनी रांची येथून एम.बी.बी.एस केले. तेव्हा आलेल्या देवीच्या साथीला प्रत्युत्तर देण्यासाठीच्या कामात स्वत:ला झोकून देण्यापासून, ग्रामीण भागात आरोग्य तपासणी ते विशेष मुलांच्या शाळेत वर्षांतून एकदा आठ दिवसांचा वेळ काढून जाणारे डॉक्टर मोघे यांनी शाळांमधील आरोग्य तपासणीच्या कार्यात त्यांचे मित्र डॉ. सुरेश बोरकर, डॉ. सचिन प्रभुणे यांना देखील बरोबर घेतले. डॉ. मोघे यांच्यासह तिघेही दहा वर्षांपूर्वीपासून ‘प्रिझम फाउंडेशन’ येथील पावणेदोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी जाऊ लागले. हे काम सेवाभावी वृत्तीने कोणताही मोबदला न घेता करण्याचा या तिघांचा निश्चय. या तपासणीमुळे मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाठी मदत होऊ लागली. याचा फायदा मुलांना जसा झाला, तसाच त्यांच्या कुटुंबाला आणि पर्यायाने त्यांच्या शिक्षकांनाही होऊ लागला. या सगळ्या कामात त्यांना आणले ते डॉ. वसंत होनवाड यांनी. आरोग्य या विषयावर पालकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने संस्थेत गेलेले डॉ. मोघे आता त्यांच्या परिवारातील सदस्यच झाले आहेत. शाळेच्या आणि आपल्या दवाखान्याच्या वेळा यांची सुयोग्य सांगड घालीत त्यांनी आपले हे कार्य नेटाने सुरू ठेवले आहे. या मुलांची शारीरिक तपासणी करीत असताना शारीरिक स्वच्छतेपासून डोकेदुखी, घशाचे आजार, श्वास घेण्याची पद्धत, नखे खाण्यासारख्या सवयी अशा विविध पैलूंशी संबंधित त्यांची संपूर्ण माहिती गोळा केली जाते. ज्याचा भविष्यातील तपासणीसाठी डॉ. मोघे यांच्या चमूला उपयोग होतोच, पण शाळेतील शिक्षक तसेच पालक यांनाही आपल्या मुलाची काळजी घेताना उपयोग होता.

मुलांचे दैनंदिन आरोग्य चांगले राहावे म्हणून ‘प्रिझम’ ने मुलांच्या आरोग्य तपासणीचा हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे मुलांच्या शारीरिक स्वच्छतेविषयीची जाणीव जशी देता आली तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी देखील मदत झाल्याचे संस्थेच्या संचालिका हर्षां मुळे यांनी सांगितले. प्रिझम फाउंडेशनतर्फे फिनिक्स स्कूल, लार्क, माधवी ओगले व्यावसायिक शाळा, बेन्यू प्रशिक्षण संस्था व सृजनरंग चालविले जाते. फिनिक्स स्कूल ही गतिरुद्ध, अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांना विशेष शिक्षण देणारी शाळा आहे. तर लार्कमध्ये मतिमंदत्व, एपिलेप्सी, बहुविकलांगता, श्रवणदोष, अस्थिरता, आक्रमकता, बुजरेपणा यांसारख्या विविध समस्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काम केले जाते. प्रिझमचे कार्य समजून घेऊन त्यांच्या मुलांसाठी कार्य करणारे डॉ. मोघे यांचे कार्य तर स्पृहणीय आहेच, पण आपल्यापैकी कोणाला या मुलांसाठी काही करायची असेल, तर (०२०) २५६७९७१४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

डॉ. मोघे यांनी १९९१ साली मारणेवाडी येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आठवडय़ातून एक दिवस तेथील घराघरात जाऊन रुग्ण तपासणी करण्याबरोबरच आरोग्यविषय जनजागृतीचे कार्य देखील तेथील शाळेच्या माध्यमातून केले. डॉ. होनवाड यांच्या स्कूटरवरून ते दोघे तेथे जात होते. तेथे त्यांनी किरकोळ आजारासाठी ग्रामस्थांमधील एकाला प्रशिक्षित केले होते. त्या गावात इयत्ता सातवीपर्यंत एक शाळा होती. तेथे आरोग्य तपासणीबरोबरच शहरातून पिशव्या भरभरून औषधे नेणे, त्या मुलांच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष देणे, मुलांचे किडके दात, जंत यांसारख्या गोष्टींवर उपाययोजना करणे आदी गोष्टी ते नेटाने करीत होते. आरोग्याशिवाय त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकसनाशी संलग्न असे चित्रकला, ओरोगामी, इंग्रजी, गणित शिकवण्यासाठी पुण्यातून शिक्षक घेऊन जात होते. हा सगळा अनुभव आनंददायी असतो. हा आनंद शिकवणाऱ्यांबरोबरच मुलांनाही घेता यावा, यासाठी त्यांनी खूप धडपड केली.

भंडारदऱ्याच्या मागे असणाऱ्या राजूर गावात जाऊन तेथील आदिवासी वस्त्यांमध्ये देखील त्यांनी १९८४ ते ८७ या कालावधीत काम केले. एसटीने तेथे जाऊन वेळप्रसंगी आश्रमशाळेत राहून त्यांनी तेथे आपले कार्य सुरू ठेवले. तेथील दहा गावांमध्ये आहाराबरोबरच, उंची-वजन यांचा अभ्यास केला. दर पंधरा दिवसांनी डॉ. मोघे या गावी जात होते. याशिवाय कुष्ठरोग निर्मूलन कार्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. मागील वर्षी ते एक महिना अरुणाचल येथे राहिले होते आणि तेथेही त्यांनी आरोग्यसेवा केली. करुणा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना या उपक्रमात सहभागी होता आले. तेथे जाताना देखील ते औषधे घेऊन गेले होते.

आपले हे सगळे कार्य होऊ शकले ते सामाजातील विविध घटकांनी केलेली मदत आणि पत्नी मृणालिनीचा पाठिंबा यामुळेच शक्य झाल्याचे डॉक्टर अभिमानाने सांगतात. डॉ. मोघे पर्यावरणाचा विचार देखील करीत असल्यामुळे आपला दवाखाना ते घर या अंतरासाठी दुचाकी न वापरता ते सायकलचा आवर्जून वापर करतात. सायकल चालविल्यामुळे तब्येतीबरोबरच पर्यावरणरक्षणाचा उपक्रम राबवणाऱ्या या आरोग्यसेवकाचे कार्य पाहिल्यावर आपणही काही करावे असे वाटल्यास नवल नाही.

shriram.oak@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr shailendra shankar moghe article
First published on: 07-09-2018 at 03:59 IST