पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले. जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना, तसेच मध्यभागातून फेरी काढण्यात आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला.

मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. मोहोळ यांनी सकाळी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर, श्री जोगेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले. तेथून ते कोथरुड येथे गेले. कोथरुड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी फेरीची सुरुवात केली. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी चौकातून फेरी काढली. जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखानामार्गे आढळराव पाटील यांची फेरी मध्यभागातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली. मोहोळ यांची फेरी कोथरुड, कर्वे रस्ता, नळस्टॉप, डेक्कन जिमखानामार्गे मध्यभागातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली.

हेही वाचा >>> चर्चा तर होणारच! मावळमधून आणखी एका संजय वाघेरेंची एन्ट्री?; भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

या फेरीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेनेसह महायुतीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाहतूक नियोजनासाठी पोलीस ठेवण्यात आले होते. वाहतूक बदलांविषयी नागरिकांना माहिती मिळाली नसल्याने गोंधळ उडाला. मोहोळ आणि आढळराव पाटील यांची फेऱ्यात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कर्वे रस्त्यासह वेगवेगळ्या भागात मोहोळ यांच्या फेरीचे स्वागत करण्यात आले. जेसीबी यंत्रातून पुष्पवृष्टी करण्यात आली. चौकाचौकात होणारे स्वागत आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे फेरी संथगतीने सुरू होती. त्यामुळे डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह मध्यभागातील बहुतांश रस्त्यांवर कोंडी झाली होती. डोक्यावर उन आणि कोंडीत अडकल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

पीएमपी मार्ग अचानक बदलल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुपारनंतर मध्यभागातील वाहतूक सुरळीत झाली.

फेरी संथगतीने; नागरिक कोंडीत

मोहोळ यांची फेरी कोथरुडमधून सुरू झाली. आढळराव पाटील यांनी जंगली महाराज रस्त्यावरुन फेरी काढली. दोन्ही फेऱ्यात कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोहोळे यांच्या फेरीचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले. फटाके फोडण्यात आले. वाहतूक बदलांविषयी नागिरकांना फारशी माहिती नव्हती. त्यामुळे डेक्कन जिमखाना भागासह कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्त्यासह मध्यभागातील रस्त्यांवर कोंडी झाल्याचे दिसून आले.