News Flash

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

पदवीधर, शिक्षक मतदार संघांच्या निवडणुका जुलै २०२० मध्ये होणार आहेत.

पदवीधरांची नोंदणी ४७ हजार ५९४; शिक्षकांची नोंदणी १३ हजार ८३३

पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे ५९ हजार ४२१ आणि १८ हजार ७१४ मतदारांचे अर्ज आले असून त्यापैकी पदवीधरसाठी ४७ हजार ५९४ आणि शिक्षक मतदार म्हणून १३ हजार ८३३ जणांची नोंदणी झाली आहे.

पदवीधर, शिक्षक मतदार यादी निरंतर अद्ययावत करण्याची तरतूद असल्याने २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबपर्यंत पुन्हा नोंदणीसाठी मुदत दिली आहे. पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले, तरीही संबंधित मतदारांना मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तसेच यापुढील प्रत्येक निवडणुकीसाठी देखील नव्याने मतदार म्हणून नावनोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबपर्यंत नावनोंदणी करण्याची मुदत होती. मात्र, पुणे विभागातील पाचही जिल्ह्य़ांमधील मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे नोंदणी झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पदवीधर, शिक्षक मतदार संघांच्या निवडणुका जुलै २०२० मध्ये होणार आहेत. त्यामुळे १ जानेवारी २०२० पासून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना मतदार म्हणून अर्ज करता येणार आहे. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघांसाठी दावे, हरकती २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.

२६ डिसेंबरला दावे, हरकतींबाबत निर्णय घेतला जाणार आहे, तर अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दोन्ही मतदारसंघात नोंदणी कमी

सन २०१४ मध्ये झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी अनुक्रमे एक लाख ६२ हजार २१३ आणि ४७ हजार ६४ मतदार होते. यंदा पदवीधरसाठी आतापर्यंत ४७ हजार ५९४ आणि शिक्षक मतदारसंघासाठी १३ हजार ८३३ मतदारांनी नोंदणी केली आहे.

पदवीधरसाठी गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल एक लाख १४ हजार ६१९, तर शिक्षक मतदारसंघात ३३ हजार २३१ एवढय़ा संख्येने मतदार घटले आहेत. परिणामी अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

अर्ज अपूर्ण असल्याचे स्पष्ट

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी नोंदणीची मुदत ६ नोव्हेंबपर्यंत होती. या कालावधीत पदवीधरसाठी ५९ हजार ४२१ अर्ज प्राप्त झाले, परंतु त्यातील ११ हजार ८२७ अर्ज अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी आतापर्यंत ४७ हजार ५९४ मतदारांची नोंदणी झाली आहे. तर, शिक्षक मतदारसंघासाठी १८ हजार ७१४ अर्जापैकी चार हजार ८८१ अर्ज अपूर्ण आहेत. त्यामुळे शिक्षक मतदारसंघासाठी आतापर्यंत १३ हजार ८३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 1:45 am

Web Title: draft voters list released for graduate and teacher constituencies zws 70
Next Stories
1 जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांची कर्जमाफी
2  पुण्यात शुक्रवारी साहित्य, संगीतमय मैफल
3 पोलीस कोठडीत आरोपींनी केला आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X