राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर निधी संकलन अवघड असल्याची सबब सांगत सातारकरांनी अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या आयोजनातून माघार घेतली आहे. त्यामुळे नाटय़संमेलन आता ठाण्याला घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या रविवारी (२२ नोव्हेंबर) त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आपल्याला अपेक्षित व्यक्तीची नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊ न शकल्यामुळे सातारकरांना दुष्काळ आठवला, अशी चर्चा नाटय़वर्तुळामध्ये रंगली आहे.
नाटय़संमेलनाच्या यजमानपदासाठी नाटय़ परिषदेची सातारा शाखा गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आणि १२-१२-१२ या शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेचे औचित्य साधून बारामती येथे नाटय़संमेलन घेतल्यामुळे पहिल्या वर्षी संधी हुकली. त्यानंतरचे नाटय़संमेलन पंढरपूर येथे झाले. या संमेलनाच्या समारोप कार्यक्रमातच सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आहोत हे दर्शविण्यासाठी बेळगाव येथे नाटय़संमेलन घ्यावे असा सूर व्यक्त झाला. त्यानुसार संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री फैयाज यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे हे संमेलन झाले. त्यामुळे नाटय़संमेलनाच्या यजमानपदावर यंदा सातारकरांचा दावा प्रबळ मानला जात होता. सुनील महाजन आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश असलेल्या स्थळ निवड समितीने नाटय़संमेलन सातारा येथे घ्यावे, असा अहवाल नाटय़ परिषदेला सादर केला होता.
नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, श्रीनिवास भणगे, प्रेमानंद गज्वी आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. विश्वास मेहेंदळे ही चार नावे होती. त्यापैकी सातारा नाटय़ परिषदेचे पदाधिकारी एका नावासाठी आग्रही होते. नाटय़ परिषद नियामक मंडळाच्या गेल्या बैठकीत नाटय़संमेलनाचे अध्यक्ष आणि स्थळ निश्चित करण्यात येणार होते. मात्र, सातारा आणि ठाणे या दोन्ही शाखांपैकी कोणाची निवड करायची, हा संभ्रम असल्याने संमेलन स्थळाचा प्रश्न अनिर्णीत ठेवण्यात आला. केवळ गंगाराम गवाणकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करून ही बैठक संपुष्टात आणली गेली. अपेक्षित व्यक्तीची अध्यक्षपदी निवड न झाल्यामुळे सातारकरांचा उत्साह मावळला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती त्यांना संमेलनाच्या यजमानपदातून माघार घेण्यासाठी साहाय्यभूत ठरली.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निधी संकलन करण्यासाठी अवघड परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही संमेलन घेण्याबाबत फारसे आग्रही नाही, असे नाटय़ परिषदेच्या सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी सांगितले. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग कुठून आणणार असा सवालही त्यांनी केला. घुमान आणि िपपरी-चिंचवड येथे साहित्यसंमेलनाच्या निमंत्रक संस्था आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्याने त्यांना ही अडचण जाणावली नाही. मात्र, सरकारचे २५ लाख रुपये आणि आम्ही संकलित केलेले २५ लाख रुपये एवढय़ा रकमेमध्ये संमेलन होऊ शकत नाही या वास्तवावर त्यांनी बोट ठेवले.