महादेवाचा उतारा टाकणाऱ्यांना जरब; उतारे टाकणारे धास्तावले

रास्ता पेठ भागातील टिळक आयुर्वेद महाविद्यालय आणि राजा धनराज गिरजी शाळेच्या मध्यभागी असलेला चौक कित्येक वर्षांपासून उतारा चौक म्हणून ओळखला जातो. या चौकात उतारे टाकण्याचे प्रकार सर्रास घडायचे. आता या चौकात एका चौथऱ्यावर महादेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यापासून उतारे टाक णाऱ्यांना जरब बसली आहे.

पुण्यासारख्या शहरात अंधश्रद्धेपोटी गैरप्रकार केल्याच्या घटना घडत असतात. अमावस्या, पौर्णिमेला लिंबू-मिरची टाकणे, तसेच काही अघोरी उपाय, तोडगे करण्यासाठी उतारे टाकण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. अमावस्या आणि पौर्णिमेला रस्त्याच्या कडेला उतारे टाकले जातात.महाशिवरात्रीच्या दिवशी या चौकात शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रास्ता पेठ- रविवार पेठ प्रभाग क्रमांक १७ मधील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी महापालिकेच्या निधीतून या चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे  उतारा चौकाचा चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. रास्ता पेठेतील नागझरी नाल्यालगत असलेल्या चौकात टिळक आयुर्वेद महाविद्यालय, सिंडीकेट बँक, राजा धनराज गिरजी विद्यालय तसेच ताराचंद आयुर्वेद रुग्णालय आहे. हा रस्ता फारसा वर्दळीचा नाही. सायंकाळनंतर या भागातील वर्दळ कमी होत जाते. या चौकात कित्येक वर्षांपासून उतारे टाकले जात होते. अस्वच्छ परिसर, तीन रस्ते एकत्र येत असल्याने अंधश्रद्धाळू या भागात उतारे टाकायचे. काहींनी या चौकाचे ‘उतारा चौक’ असे  नामकरणच करून टाकले. एवढेच नव्हे तर तेथे ‘उतारा चौक’ असे रंगविण्यात आले होते.

मी शाळेत असल्यापासून या भागातून जाताना भीती वाटायची. या चौकात उतारे टाकले जायचे. त्यामुळे शक्यतो या रस्त्यावरुन सायंकाळी जाणे टाळायचो, असे नगरसेवक विशाल धनवडे यांनी नमूद केले. ते म्हणाले, दिवसभर वर्दळ असली तरी सायंकाळनंतर या भागात शुकशुकाट असतो. या चौकाविषयी नागरिकांना वाटणारी भीती तसेच उतारे टाकण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी या चौकात महादेवाची मूर्ती बसविण्यात यावी, जेणेकरुन गैरप्रकारांना आळा बसेल, या विचाराने निर्णय घेतला. चार महिन्यांपूर्वी या चौकात मूर्ती बसविण्याची मान्यता मिळाली. विश्वकर्मा आर्ट्सकडून सात फूट उंचीची मूर्ती घडविण्यात आली. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळा कदम यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

या चौकाची आता स्वच्छता झाली आहे. स्थानिक नागरिक तसेच राजा धनराज गिरजी शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. अनिल ठोंबरे, तुषार धनवडे, प्रवीण डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले, असे त्यांनी सांगितले.

उतारा चौकात महादेवाची मूर्ती बसविण्यात आल्याने उतारे टाकण्याचे प्रमाण कमी झाले. पूर्वी शाळेत येणारे पालक तसेच मुले घाबरायचे. आता त्यांच्या मनातील भीती कमी झाली आहे. चौकात स्वच्छता होत असल्याने वातावरण देखील बदलले आहे. पूर्वी हा रस्ता नागरिक जाणीवपूर्वक टाळायचे.

– विकास सोनवणे, प्राचार्य राजा धनराज गिरजी शाळा, रास्ता पेठ