प्रकाश खाडे

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणची मंदिरे चार महिन्यापासून बंद आहेत. मंदिरे बंद असल्याने भाविकांना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्रांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून मंदिरावर ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे अशा कुटुंबाचे जगणे मुश्किल झाल्याचे चित्र दिसत आहे.  प्रामुख्याने जेजुरी, तुळजापूर, कोल्हापूर, वणी, माहूरगड, अष्टविनायक, आळंदी, पंढरपूर आदी ठिकाणची ७५ टक्के अर्थव्यवस्था येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. तीर्थक्षेत्रांमध्ये वंशपरंपरेने गुरव, ब्राह्मण, वीर घडशी, महादेव कोळी, गोसावी, स्वामी, हारफुलें करणारे माळी, सेवेकरी, मानकरी, वाघ्यामुरुळी, गोंधळी आदी समाजबांधव मंदिराशी सम्बधित आहेत.

याशिवाय भंडार खोबरे, प्रसाद पुडे, नारळ, देवांच्या मूर्ती, फोटो व देवकार्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य, प्लास्टिक खेळणी यांची विक्री करणारे छोटे मोठे व्यावसायिक खूप आहेत.  हातावरचे पोट असणारे पथारीवाले, कष्टकरी यांची रोजीरोटी बंद झाल्याने रोजचा दिवस कसा ढकलावा या विवंचनेने त्यांना ग्रासले आहे. बहुतांशी मंदिरात हजारो पुरोहित कुलधर्म कुलाचाराची कामे करतात. अनेक पुरोहितांनी बँका, पतसंस्था यांचेकडून मोठमोठी कर्जे घेऊन भाविकांसाठी जुनी घरे पाडून निवासस्थाने बांधली आहेत. कोरोना येण्यापूर्वी सर्वच धार्मिक स्थळांना प्रचंड गर्दी कायम होती. पैसे चांगले मिळत असल्याने पुरोहित व गावातील इतर व्यावसायिकांनी धाडस करून लॉज, उपहारगृहे, भक्त निवास उभारली, परंतु आता मंदिरे कोरोनामुळे किती काळ बंद राहणार याची शाश्वती नसल्याने साऱ्यांच्याच झोपा उडाल्या आहेत.

कर्जाचे हप्ते, लोकांची देणी थकल्याने अनेकजण मानसिक तणावाखाली आल्याचे चित्र दिसत आहे. क्षेत्रामध्ये असलेल्या पुरोहित वर्गामध्ये तरुण वर्गाची संख्या मोठी आहे. नोकऱ्या नसल्याने पारंपरिक व्यवसायावरच यांचा प्रपंच अवलंबून आहे.  लॉकडाऊन नंतर बहुतेक उद्योग सुरू झाले असून मंदिरे मात्र कोरोनावाढीच्या भीतीमुळे बंदच आहेत. धार्मिक क्षेत्रे ओस पडली असून उधार उसनवारी करून अनेकजण दिवस पुढे ढकलत आहेत. रोजगार थांबल्याने काही तरुण पुजाऱ्यांनी जवळच्या एम.आय.डी.सी. मध्ये नोकरीसाठी हेलपाटे घातले पण तेथेही नोकऱ्या मिळाल्या नाहीत. एस.टी. बस, खासगी वाहने बंद असल्याने भाविक येत नाहीत. दुसरा व्यवसाय तरी कोणता करावा हा प्रश्न सर्वांसमोर आहे. जेजुरीत खंडोबाचा कुलधर्म कुलाचार करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी असते. यात प्रामुख्याने नवविवाहित जोडप्यांची संख्या जास्त असते. पुजाऱ्यांच्या घरी व होळकरांच्या चिंचबागेत जागरण गोंधळाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होतात, हजारो पाहुणे रावळे जेवतात. सारी जेजुरी नगरी दररोज उद्योगात गुंतलेली असते. परंतु आता येथील रस्त्यांवर व चिंचबागेत शुकशुकाट आहे. ‘येळकोट येळकोट जयमल्हार’ असा जयघोष करीत भंडारखोबरे उधळणारा भाविक दिसत नाही. मंदिरातील मंत्रघोष, तळीभंडारा थांबला आहे.

गावात सर्वत्र लग्नाच्या देवकार्याचे जागरण गोंधळ करणारे वाघ्यामुरुळींचे ताफे आहेत. त्यांच्या टिमकी व संबळाचा घुमणारा आवाज थांबला असून  पैश्याअभावी ते विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत. खंडेरायाची सोन्याची जेजुरी लॉकडाऊन मुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे. सर्वच तीर्थक्षेत्रांची हीच अवस्था असून कोरोनाच्या संकटामुळे प्रगतीची चाके थांबली आहेत. मंदिरे खुली केल्यास सोशल डिस्टंसिंग चे पालन होणार नाही अशी शासनाची भुमिका आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली करून सर्व मंदिरे देवदर्शनासाठी खुली करावीत अशी भाविकांची व तीर्थक्षेत्रातील ग्रामस्थांची मागणी आहे.