21 September 2020

News Flash

‘एएफएमसी’च्या तज्ज्ञांकडून वैद्यकीय विद्यार्थ्यांना ई-शिकवणी!

राज्यातील वैद्यकीय (एमबीबीएस) विद्यार्थ्यांनाही आता ‘ऑनलाईन’ धडे पुण्यातील ‘आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’चे (एएफएमसी) वैद्यकीय तज्ज्ञ देणार आहेत.

| June 19, 2014 03:05 am

राज्यातील वैद्यकीय (एमबीबीएस) विद्यार्थ्यांनाही आता ‘ऑनलाईन’ धडे घेता येणार आहेत. विशेष म्हणजे हे धडे त्यांना पुण्यातील ‘आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’चे (एएफएमसी) वैद्यकीय तज्ज्ञ देणार आहेत.
एएफएमसीचे अधिष्ठाता व डेप्युटी कमांडंट मेजर जनरल वेलु नायर यांनी ही माहिती दिली. बुधवारी शालेय विद्यार्थी व पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या महाविद्यालय भेटीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. एएफएमसीचे संचालक व कमांडंट व्हाईस अॅडमिरल सुशील कुमार या वेळी उपस्थित होते. गेल्या वर्षभरापासून एएफएमसीमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ई- लर्निगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही संकल्पना नाशिकच्या ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’चे (एमयूएचएस) कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांना आवडल्यामुळे त्यांनी एएफएमसीकडे ही सुविधा राज्यातील इतरही वैद्यकीय महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्याबद्दल विचारणा केल्याचे नायर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या उपक्रमाअंतर्गत एमयूएचएसच्या ४६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी ई-लर्निग सुविधा उपलब्ध होणार आहे. एएफएमसीचे तज्ज्ञ डॉक्टर ही व्याख्याने देणार असून ती एमयूएचएसमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जातील. पुढील वर्षी एप्रिलपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल.’’
एएफएमसीत सुरू असलेल्या ई- लर्निगमध्ये विद्यार्थ्यांना वर्गात दुसऱ्या दिवशी घेतल्या जाणाऱ्या तासांचा अभ्यासक्रम आदल्या दिवशीच ऑनलाईन शिकायची संधी मिळते. त्यामुळे वर्गातील तासाच्या वेळी त्यांना प्रश्न विचारायला अधिक वाव मिळतो. यासाठी महाविद्यालयाचा परिसर वायफाय करून घेण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातही संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत, असेही नायर यांनी सांगितले.
 
वीरगती प्राप्त होणाऱ्या सैनिकांची
ओळख ‘डीएनए’वरून कळणार
देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकांची ओळख पटवणे अनेकदा परिस्थितीनुसार जिकिरीचे ठरते. ही ओळख पटवण्यासाठी एएफएमसीने जीव सर्वाधिक धोक्यात घालून काम करणाऱ्या सैनिकांचे ‘डीएनए प्रोफायलिंग’ करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प एक वर्षांपूर्वी सुरू झाला असून त्याचे सुमारे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. वेलु नायर म्हणाले, ‘‘लढाऊ वैमानिक, पाणबुडे आणि अत्युच्च ठिकाणच्या बर्फाळ प्रदेशात लढताना शहीद होणाऱ्या सैनिकांची ओळख डीएनए प्रोफायलिंगमुळे कळेल. यात प्रत्येक सैनिकाच्या डीएनएची नोंद करून घेतली जात असून २०२० पर्यंत सर्व लष्करी दलांच्या सैनिकांचे डीएनए नोंद करण्याचे लक्ष्य आहे. आम्ही केलेले डीएनए प्रोफायलिंग पडताळून पाहण्यासाठी आम्ही स्पेनच्या अद्ययावत प्रयोगशाळेतूनही डीएनए चाचणी करून घेतो.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 3:05 am

Web Title: e learning from afmc to medical students
टॅग E Learning
Next Stories
1 राजमाचीवर यापुढे रात्रीच्या वेळी ट्रेकिंग नाही! –
2 अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार
3 फग्र्युसन महाविद्यालयात ‘बी.व्होक’ अभ्यासक्रम
Just Now!
X