‘आयसर’च्या शास्त्रज्ञांचे संशोधन; पर्यावरणाची हानी टाळणे शक्य

चिन्मय पाटणकर, पुणे हायड्रोजनच्या वापरातून रिचार्ज (पुनर्विद्युतभारित) होऊ शकणाऱ्या बॅटरीचे (विजेरी) संशोधन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्चच्या (आयसर) संशोधकांनी केले आहे. ही बॅटरी  प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असून, या बॅटरीच्या वापरातून पर्यावरणाची हानी टाळणे शक्य होणार आहे.

आपल्याकडे बहुतांश इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बॅटरी वापरली जाते. त्यातील काही बॅटरी रिचार्ज करण्याजोग्या असतात, तर काही संपल्यानंतर टाकून द्याव्या लागतात. या बॅटरीमध्ये वापरण्यात आलेले लिथियम पर्यावरणासाठी घातक असते. तसेच त्यातील रसायनांमुळे कॅन्सरचा धोका संभवतो.

या पाश्र्वभूमीवर, आयसरच्या डॉ. नीथू सीडी आणि डॉ. रवीकुमार थिमप्पा या संशोधकांनी हायड्रोजनचा वापर करून पर्यावरणपूरक आणि रिचार्ज होणारी बॅटरी विकसित केली आहे.

त्यासाठी त्यांना डॉ. मोहम्मद मुस्तफा यांनी मार्गदर्शन केले. या बाबतचे संशोधन ‘नेचर एशिया’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

संशोधन काय आहे?

या प्रयोगात पारंपरिक बॅटरीतील प्लॅटिनम कॅथोडच्या जागी हायड्रोजनची साठवणूक करणारा क्विनो हा रेणू वापरला आहे. त्याच्या मदतीने ऑक्सिडीकरण झालेला हायड्रोजन (प्रोटॉन) अ‍ॅनोडजवळ पकडता येतो. या रेणूत असलेला विशेष गुणधर्म हायड्रोजन साठवूही शकतो आणि सोडूही शकतो. त्यामुळे ही बॅटरी अनेकदा रिचार्ज करता येते. त्यामुळे मूळ क्विनो रेणू आणि हायड्रोजन इंधन हे पुन्हा अ‍ॅनोडजवळ तयार होते. त्यातून रिचार्जेबल बॅटरी ही प्रदूषणकारी नसलेले रेणवीय इंधन वापरून तयार करता येते, असे संशोधन निबंधात म्हटले आहे. ही बॅटरी रिचार्ज के ली जाणारअसल्याने नेहमी हायड्रोजन जवळ बाळगावा लागत नाही. या पूर्वी हे विद्युतघट वापरण्यासाठी हायड्रोजन बाळगण्याची असलेली समस्या आता या संशोधनामुळे सुटणार आहे.

संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात हायड्रोजन वायूचा वापर करून हे संशोधन यशस्वी झाले. ही बॅटरी साधारणपणे २०० वेळा रिचार्ज करता येतो. मात्र, त्यावर न थांबता हे संशोधन पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅटरीमध्ये हायड्रोजनची कायमस्वरूपी साठवणूक करता येण्याजोग्या पदार्थाचे संशोधन सुरू आहे. ही बॅटरी प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी आणखी दोन वर्षे जातील. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यावर ही बॅटरी किफायतशीर दरात उपलब्ध होऊ शकेल आणि सर्व उपकरणांमध्ये वापरता येईल. 

-डॉ. मुहम्मद मुस्तफा, मार्गदर्शक, आयसर