24 January 2019

News Flash

जुन्या कपडय़ांपासून बनवलेल्या नवीन वस्तूंचे दालन

इको रिगेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक स्वप्निल जोशी यांनी या बाबतची माहिती दिली.

इको रिगेन सोल्युशन्सतर्फे जुन्या कपडय़ांपासून तयार करण्यात आलेल्या नवीन कपडय़ांचे दालन सुरू करण्यात येणार असून, त्यामध्ये जुन्या कपडय़ांपासून बनवलेली बॅग, सतरंजी, चादर अशा अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

‘इको रिगेन सोल्युशन्स’चा पुढाकार; स्वयंसेवी संस्था, निम्न आर्थिक गटांचा सहभाग

जुन्या कपडय़ांच्या पुनर्वापरातून तयार करण्यात आलेल्या, तरी नव्यासारख्या दिसणाऱ्या वस्तूंच्या नवीन दालनाचे उद्घाटन बुधवारी होणार आहे. जुन्या कपडय़ांपासून तयार झालेल्या वस्तूंना ‘ब्रँड व्हॅल्यू’ मिळवून देण्यासाठी इको रिगेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने या दालनाची सुरुवात करण्यात येणार आहे.

इको रिगेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक स्वप्निल जोशी यांनी या बाबतची माहिती दिली. ते म्हणाले, वापरून जुने झालेले कपडे स्वयंसेवी संस्थांना किंवा निम्न आर्थिक गटातील व्यक्तींना देऊन टाकण्याकडे आपला कल असतो. मात्र अशा पद्धतीने त्या कपडय़ांची संपूर्ण विल्हेवाट कधीही लागत नाही. शेवटी असे कपडे उघडय़ावर नेऊन फेकले जातात, त्यांचे जमिनीत विघटन होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. शिवाय, त्या विघटनातून मिथेन आणि कार्बन डाय ऑक्साइडची निर्मिती होते, त्यामुळे तापमानवाढीला अप्रत्यक्षपणे हातभार लागतो, म्हणूनच त्याचा संपूर्ण पुनर्वापर करणे हा एकमेव पर्याय आहे. ऑगस्ट २०१६ पासून वापरून जुने झालेले चांगले आणि फाटलेले कपडे जमवण्यास आम्ही सुरुवात केली. पानिपत येथे एक संपूर्ण पुनर्वापर उद्योग अस्तित्वात असल्याने हे कपडे तेथे पाठवून त्यांच्यापासून वापरायोग्य नवीन वस्तू बनवून घेतल्या जात होत्या.

अशा प्रकारे वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण आजूबाजूच्या महिला बचत गटांना दिले तर त्यांना रोजगार मिळेल, या विचारातून आम्ही शहरात काम करण्यास सुरुवात केली. गृहनिर्माण संस्थांमध्ये जुने कपडे गोळा करण्यासाठी मोहीम घेतली असता १०० किलो कपडय़ांचे संकलन आम्ही करू शकलो. त्यांच्या पुनर्वापरातून विविध प्रकारच्या बॅग, गालिचे, सतरंजी, चादर अशा वस्तू तयार करण्यात आल्या आहेत, असेही जोशी यांनी सांगितले. या वस्तूंच्या किमती ३०० रुपये ते १००० रुपयांमध्ये असल्याने त्या सामान्यांच्या आवाक्यात आहे. रेणुका स्वरूप शाळेसमोर हे दालन होणार असून बुधवारपासून ते सर्वासाठी खुले होणार आहे.

First Published on April 17, 2018 2:47 am

Web Title: eco regain solutions initiative to make new things from old clothes