नगर रस्ता भागात उत्पादन व्यवस्थापकाची कामगारांनी साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याचे निष्पन्न

नगर रस्ता भागात झेडएफ कंपनीतील उत्पादन व्यवस्थापकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांकडून आठ जणांना अटक करण्यात आली. कंपनीतील कामगारांनी साथीदारांच्या मदतीने उत्पादन व्यवस्थापकाचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी कामगार दिनेश साळुंके, राजू साळवे, व्यंकट बॉस, साथीदार  विशाल आदेश जामदार (वय २०), अक्षय दादाभाऊ ओव्हाळ (वय २१), गणेश पोपट शिंदे (वय २०), सिद्धांत राजेंद्र महागडे (वय १९), सोमनाथ संदीप नेटके (वय २०, सर्व रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अस्लम कोठाळी (वय ३८) असे खून झालेल्या उत्पादन व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वढू बुद्रुक येथील झेडएफ कंपनीत एका कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या वादातून दोन संघटना सुरु झाल्या. कंपनी व्यवस्थापनाकडून तेरा कामगारांना निलंबित करण्यात आले होते. कंपनीतील संघटनांमध्ये असलेल्या वादातून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे कामगार चिडले होते. उत्पादन व्यवस्थापक कोठाळी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप आरोपी दिनेश साळुंके, व्यंकट  बॉस, राजू साळवे यांनी केला होता.

या कारणावरुन त्यांनी साथीदार विशाल जामदार, अक्षय ओव्हाळ, गणेश शिंदे, सिद्धांत महागडे, सोमनाथ नेटके यांना हाताशी धरून उत्पादन व्यवस्थापक कोठाळी यांना मारहाण करण्याचा कट रचला होता. कोठाळी गेल्या गुरुवारी (२२ मार्च) रात्री कामावरुन निघाले.

पेरणे फाटा भागात दबा धरून बसलेल्या आरोपींनी लाकडी दांडक्याने कोठाळी यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या कोठाळी यांना नगर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर कंपनीतील अधिकाऱ्यांमध्ये घबराट उडाली होती.

पोलीस अधीक्षक सुवेझ हक,अतिरिक्त अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय आधिकारी सुहास गरुड  यांनी आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक निरीक्षक सुधीर तोरडमल, तुकाराम चांदीलकर, बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे यांनी तपास करुन पसार झालेल्या आरोपींना पकडले. न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवापर्यंत (२ एप्रिल) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

गुंडगिरीचा बीमोड करण्याची मागणी

दरम्यान, या घटनेमुळे कामगार तसेच अधिकारी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. याबाबत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पसरेनेल मॅनेजमेंटच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना निवेदन दिले. औद्योगिक वसाहतींच्या परिसरातील गुंडगिरीचा बीमोड करावा, अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे. एनआयपीएम व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अ‍ॅ्रग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) बुधवारी (२८ मार्च) मराठा चेंबरच्या सभागृहात सायंकाळी सहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्य़ातील विविध कंपन्यांमधील मनुष्यबळ विभागातील अधिकारी या बैठकीत सहभागी होणार असल्याचे एनआयपीएमचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी कळविले आहे.