कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ५० मधून पदयात्रेच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार आमदार गिरीश बापट यांनी मंगळवारी मतदारांशी तसेच मंडई व परिसरातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. शिवसेनेचे उमेदवार प्रशांत बधे यांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी झाला.
बापट यांची पदयात्रा तुळशीबागेतून सुरू झाली. मंडई परिसरात व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन नंतर बापट यांनी बुरुड आळीतील मतदारांशी संपर्क साधला. त्यानंतर शिंदे आळी, बाजीराव रस्ता, नातूबाग, शनिपार, कुमठेकर रस्ता या भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. नगरसेवक अशोक येनपुरे, दिलीप काळोखे, तसेच सुहास कुलकर्णी, उदय जोशी, अशोक वझे, राजेश येनपुरे, दीपक रणधीर, प्रदीप इंगळे, संजयमामा देशमुख, गिरीजा बापट, रागिणी खडके, मोहना नातू, योगिता गोगावले यांची या वेळी उपस्थिती होती.
प्रशांत बधे यांच्या प्रचाराचा प्रारंभ
शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत बधे कसब्यातील उमेदवार असून त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला. ढोल-ताशा पथकांच्या दणदणाटात बधे यांची संपर्क फेरी मध्य भागात काढण्यात आली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश बोडके, तसेच गजानन पंडित, विशाल धनवडे, रवींद्र म्हंकाळे, रवी वडके, राजेंद्र चांडक, सचिन चिंचवडे, संजय बोडके, दीपक कुंजीर या वेळी उपस्थित होते. कसबा पेठ, रविवार पेठ भागात सकाळी आणि लोहियानगर, महापालिका वसाहती, एकबोटे कॉलनी या भागात सायंकाळी बधे यांनी मतदारांशी संपर्क साधला.
कॅन्टोन्मेंटमध्ये रमेश बागवे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन
कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार रमेश बागवे यांच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. पदयात्रा आणि व्यक्तिगत गाठीभेटींनाही बागवे यांनी सुरुवात केली असून कार्यकर्ते मतदारांपर्यंत बागवे यांचे आवाहन पत्रक पोहोचवण्याची योजना राबवत आहेत.
महात्मा गांधी रस्त्यावरील ट्रायलक हॉटेलजवळ बागवे यांनी मुख्य कचेरी सुरू केली असून तिचे उद्घाटन पी. ए. इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील काँग्रेस सरकारने अनेक चांगले प्रकल्प साकारले आहेत. अनेक विकासकामे केली आहेत. विकासनिधीच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक चांगली कामे मी केली आहेत. काँग्रेसची विकासाची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन बागवे यांनी मेळाव्यात बोलताना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून दूर जाऊन जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असेही आवाहन बागवे यांनी या वेळी केले. नगरसेवक सुधीर जानजोत, लता राजगुरु, लक्ष्मी घोडके, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरुद्दीन सोमजी, माजी नगरसेवक रशीद शेख तसेच विनोद मथुरावाला, गौतम महाजन, प्रसाद केदारी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
पर्वतीतील राष्ट्रवादीचे बंडखोर शिवलाल भोसले माघार घेणार
 पर्वती मतदारसंघातील दोन अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार शिवलाल भोसले अखेरच्या दिवशी, बुधवारी माघार घेणार आहेत.  
भोसले यांनी पक्षाच्या ए बी फॉर्मशिवाय उमेदवारी अर्ज भरल्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष होते. या मतदारसंघात पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सुभाष जगताप निवडणूक लढवत आहेत. भोसले यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक होतो. मात्र, पक्षासाठी माघार घेणार आहे. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारही करणार आहे,’ असे भोसले यांनी सांगितले. या मतदारसंघातून गणेश लगस आणि रमेश धर्मावत या दोन अपक्ष उमेदवारांनीही माघार घेतली आहे.  
 शिवसेना उमेदवारांना उपनेत्याचे मार्गदर्शन
विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या शिवसेना उमेदवारांना उपनेते शशिकांत सुतार यांनी मंगळवारी मार्गदर्शन केले.
शशिकांत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सर्व मतदारसंघातील शिवसैनिकांची यंत्रणा जोमाने कामाला लागली असून विधानसभेवर भगवा फडकविल्याखेरीज शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असे सुतार यांनी सांगितले. या बैठकीस शहरप्रमुख अजय भोसले, रमेश बोडके, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख निर्मला केंढे, सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे, शहर उपप्रमुख संजय मोरे, बाळा ओसवाल, विलास सोनावणे, गजानन पंडित, तानाजी लोणकर, महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, मकरंद पेठकर उपस्थित होते.
प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक प्रचाराचा आढावा घेण्यासाठी डेक्कन जिमखाना येथे दररोज दुपारी दोन वाजता शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे शशिकांत सुतार यांनी सांगितले.