राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकांची व्यूहरचना सुरू केली असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही जागांच्या ‘अदलाबदली’च्या मुद्दय़ावरून आघाडी तसेच महायुतीत प्रचंड ओढाताण होणार आहे. शिवसेनेकडे असलेला भोसरी मतदारसंघ भाजपला तर राष्ट्रवादीकडील पिंपरी मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. काँग्रेसचा चिंचवड मतदारसंघ बदलून घेण्यासाठी राष्ट्रवादीत नव्याने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आतापासूनच सुरू झालेल्या या घडामोडींमुळे आगामी काळात राजकीय उलथापालथीचे स्पष्ट संकेत आहेत.
भोसरी, पिंपरी, चिंचवड या मतदारसंघांचे आघाडी व महायुतीने वाटप ठरवून घेतलेले आहे. त्यानुसार, भोसरी मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादी, पिंपरी मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादी तर चिंचवड मतदारसंघात काँग्रेस-शिवसेना अशा लढतीचे चित्र असते. तथापि, शिवसेनेकडील भोसरी मतदारसंघ यंदा भाजपला हवा आहे. मूळ भाजपचा असलेल्या या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचा युक्तिवाद करत माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी रान पेटवण्यास सुरुवात केली आहे. तथापि, शिवसेनेच्या गोटात पवारांना व त्यांच्या मागणीला फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही. हा निर्णय उच्चस्तरीय पातळीवर होईल, असे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी तर मतदारसंघात बदल होणार नाहीत, असे संपर्कनेते गजानन कीर्तिकर यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
पिंपरी मतदारसंघ भाजपकडे असून तो रपिंाइंला हवा आहे. त्यासाठी संभाव्य दावेदार चंद्रकांता सोनकांबळे प्रचंड आग्रही आहेत. खासदार रामदास आठवले हा मतदारसंघ भाजपकडून सोडवून घेतील, असा ठाम विश्वास रपिंाइं कार्यकर्त्यांना आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडील पिंपरी काँग्रेसला मिळावा, यासाठी काँग्रेसचे माजी उपमहापौर गौतम चाबुकस्वार व एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे आदींचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. सर्वाधिक नाटय़मय घडामोडी चिंचवड मतदारसंघात अपेक्षित असून त्याची झलक आतापासूनच दिसते आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या खंजीर अस्त्राने घायाळ झालेले काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी हितचिंतकाचा ‘सहस्रभोजन’ कार्यक्रम घेत स्वत:ची उमेदवारी जाहीर करून टाकली. पक्ष कोणताही असू शकतो, असे ‘सस्पेन्स’ही निर्माण केल्याने अनेक तर्कवितर्क सुरू झाले. शिवसेनेकडून शहरप्रमुख राहुल कलाटे यांचे नाव मुख्य स्पर्धेत राहणार आहे. त्यातच सध्या हा मतदारसंघ राष्ट्रवादीने घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मयूर कलाटे यांनी पक्षाकडे केल्याने ‘भाऊबंदकी’चे चित्रही निर्माण होऊ लागले आहे. महायुतीत जागांची अदलाबदल होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. आघाडीतील बदल करायचा झाल्यास तो उपमुख्यमंत्री अजित पवार व संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या संमतीने होऊ शकणार आहे.