पुणे जिल्ह्य़ातील ७०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २२ एप्रिलला मतदान होणार असून, २३ एप्रिलला मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकसभा व विधानसभेच्या धर्तीवर होणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत निवडणूक समन्वय अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कवितके म्हणाले, जिल्ह्य़ातील ७०९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणाबाबतची कार्यवाही यापूर्वीच पूर्ण झालेली आहे. प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी १४ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८०० मतदारांसाठी एका मतदान केंद्राची रचना करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १६ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्याने त्यासाठी ६५९७ बॅलेट युनिट व ७११३ कंट्रोल युनिट राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध होणार आहेत. नकाराधिकार (नोटा) बटनाची व्यवस्थाही त्यात असणार आहे.
मागील निवडणुकीमध्ये जिल्ह्य़ातील १०५ मतदान केंद्र संवेदनशील होती. यंदा अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्राची संख्या जाहीर करण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा २५ हजारांची असून, उमेदवारांना खर्चाचा तपशील निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांची प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल.
ऑनलाइन अर्जाची पद्धत रद्द
जिल्ह्य़ात मागील तीनचार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकींमध्ये उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यंदाच्या निवडणुकीसाठी आॉनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत रद्द करण्यात आली आहे. आता उमेदवाराला पूर्वीप्रमाणेच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अनुसूचित जाती-जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग या राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबतच जात प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करणे बंधनकारक असल्याचे कवितके यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज सादर करण्याचा दिनांक- ३१ मार्च ते ७ एप्रिल
– अर्जाची छाननी- ८ एप्रिल
– उमेदवारी अर्ज मागे घेणे- १० एप्रिल (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
– निवडणूक चिन्हाचे वाटप- १० एप्रिल (दुपारी ३ नंतर)
– मतदान- २२ एप्रिल (सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच)
– मतमोजणी- २३ एप्रिल