सात महिन्यांनंतरही योजना कागदावरच

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणारे प्रदूषण लक्षात घेता पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील काही मार्गावर ई-रिक्षा सुरू करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसादाअभावी खीळ बसली आहे. शासनाच्या धोरणानुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ई-रिक्षांसाठी अधिकृत परवाने आणि विविध सवलती जाहीर केल्या. मात्र, सात महिन्यांनंतरही या योजनेला योग्य प्रतिसाद नसल्याने सद्य:स्थितीत ती कागदावरच राहिली आहे.

शहरात वाहनांची संख्या सध्या झपाटय़ाने वाढत आहे. सद्य:स्थितीत माणशी एक वाहन रस्त्यावर धावत आहे. त्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्याचा विचार करता शहरातील वाहतुकीच्या कोंडीपेक्षा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर प्रवासी वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या ई- रिक्षांचा, त्याचप्रमाणे अशाच इतर वाहनांची संख्या वाढविण्याचे शासनाचे नियोजन आहे. ई-रिक्षाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या सुविधेसाठी विविध सवलतीही शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ई-रिक्षा चालविण्यासाठी स्वतंत्र ट्रान्सपोर्ट परवाना काढावा लागणार असला, तरी त्यासाठी चालकाला आठवी पास ही शिक्षणाची अट घालण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून संबंधित चालकाने प्रशिक्षण घेणे अपेक्षित नाही. ई-रिक्षा उत्पादक कंपन्यांकडून संबंधिताला प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर चालकाला ई-रिक्षा चालविण्याचा परवाना देण्यात येतो. ई-रिक्षांना नियमानुसार तंदुरुस्ती चाचणी (फिटनेस) करावी लागेल. मात्र, या सुविधेसाठी केंद्राच्या धोरणानुसार कराची आकारणी केली जाणार नाही.

ई-रिक्षाचे भाडे ठरवण्याचा अधिकारही चालकालाच दिला आहे. ई-रिक्षाचा वेग प्रतितास २५ किलोमीटर आहे. बॅटरी घरगुती प्लगद्वारेही चार्ज करता येते. सात ते आठ तास चार्जिग केल्यानंतर रिक्षा ८० ते १०० किलोमीटर धावू शकेल. विशेष म्हणजे एका वेळच्या चार्जिगसाठी केवळ तीन युनिट वीज लागते. या सर्व जमेच्या बाजू असतानाही ई-रिक्षा चालविण्याचा परवाना काढण्यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही.

नियोजित मार्गाना ई-रिक्षांची प्रतीक्षा

गतवर्षी ऑगस्टमध्ये ई-रिक्षांना अधिकृत परवाने देण्याची योजना सुरू केली. त्यासाठी मार्गही नियोजित करण्यात आले आहेत. पद्मावती चौक ते बालाजीनगर चौक,  पुष्पमंगल चौक ते चंद्रलोक चौक,  खडीमशीन चौक ते उंड्री चौक,  विश्रांतवाडी चौक ते ५०९ चौक,  गणपतीमाथा ते कोंढवे धावडे,  धायरी फाटा चौक ते राजाराम पूल चौक,  पाषाण-सूस रस्ता, साई चौक ते सूस खिंडीपर्यंत,  कमांड हॉस्पिटल रस्ता,  बी. टी. कवडे रस्ता,  वानवडी बाजार रस्ता,  संभाजी चौक ते भक्तिशक्ती चौक (निगडी), सांगवी फाटा ते कस्पटे चौक,  काळेवाडी फाटा ते पिंपरी,  नाशिक फाटा ते कस्पटे चौक या मार्गावर ई-रिक्षा प्रस्तावित आहे.