जुनाट यंत्रणा, महावितरणचा गलथानपणा नागरिकांच्या जीवावर

पुणे : भोसरीच्या इंद्रायणीनगर भागात वीज रोहित्राचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत यापूर्वीही नागरिकांचा नाहक बळी गेल्याच्या अशा घटना घडल्या आहेत. बहुतांश वेळेला रोहित्राला आणि वीज वितरण पेटय़ांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. जुनाट यंत्रणा आणि महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गलथानपणा त्यातून वेळोवेळी समोर आला असतानाही त्याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने विद्युत रोहित्र नागरिकांसाठी छुपे बॉम्ब ठरत आहेत.

भोसरीत ५ सप्टेंबरला महावितरणच्या रोहित्राचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत आई, चार महिन्यांची मुलगी आणि तिच्या आजीचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी चिंचवड स्टेशन भागातही रोहित्राचा स्फोट होऊन एका अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला होता. खराडी येथील झेन्सार कंपनीसमोरही काही वर्षांपूर्वी रोहित्राच्या स्फोटात दोन तरुण अभियंत्यांना जीव गमवावा लागला होता. याशिवाय रोहित्रातून ठिणग्या उडाल्याने घरांना आगी लागण्याचे आणि त्यातून जखमी होण्याचे प्रकारही शहरात अनेकदा घडले आहेत. विशेष म्हणजे सध्या पुणे विभागात रोहित्रांबाबत देखभाल-दुरुस्ती, क्षमतावाढ आदींबाबत अभियान सुरू असलेल्या कालावधीतच भोसरीत रोहित्राचा स्फोट झाला आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गलथानपणा अधोरेखित झाला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महावितरणची बहुतांश रोहित्र शहराच्या नागरी वस्तीत आहेत. ऑईलचा वापर असलेल्या या रोहित्रांची देखभाल-दुरुस्ती नियोजित वेळेत न झाल्यास त्यातून ठिणग्या बाहेर पडणे किंवा थेट स्फोट होण्याचे प्रकार झाले आहेत. रोहित्रातून ठिणग्या बाहेर पडल्यास आग लागू नये म्हणून रोहित्र पत्र्याने झाकून टाकण्याच्या तकलादू योजनेशिवाय आजवर कोणतेही ठोस उपाय झाले नसल्याचा आरोप वीज क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे. अनेक रोहित्रांवर सध्या अतिरिक्त भार असल्याने त्यांची क्षमतावाढ आवश्यक आहे. अनेकदा वेळेत देखभाल-दुरस्तीही केली जात नाही. त्याचप्रमाणे काही रोहित्र तसेच इतर यंत्रणा जुनाट झाली असतानाही वेळेत बदलली जात नाही. हे सर्व प्रकार नागरिकांचा नाहक बळी घेत असल्याचे वास्तव आहे. याबाबत सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगण्यात येत असले, तरी महावितरणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.

वीज यंत्रणांजवळील अतिक्रमणेही कारणीभूत

शहरातील रोहित्र किंवा इतर वीज यंत्रणेच्या परिसरात होणारी अतिक्रमणेही अनेकदा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीच्या प्रक्रियेत अडथळा ठरत असल्याचे मत काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. वीज यंत्रणेजवळील अतिक्रमणांबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात येतात, पण पालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी अडथळा आणि अपघातासाठी कारणीभूत ठरू शकणारी वीज यंत्रणेजवळील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका आणि महावितरणमध्ये समन्वयाची आवश्यकताही अधोरेखित झाली आहे.