पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आपत्कालीन उपचार केंद्र (ट्रॉमा सेंटर) लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबरोबरच या महामार्गावर अपघात झाल्यानंतर हवाई रुग्णवाहिका उतरवण्यासाठी या केंद्राच्या इमारतीवर हेलिपॅड बांधून तयार करण्यात आले आहे.

द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन उपचार केंद्र आणि केंद्राच्या इमारतीवर हेलिपॅड उभारण्याच्या कामाला गेल्या अडीच वर्षांपासून विलंब होत आहे, याबाबत काय कार्यवाही केली, सद्य:स्थिती काय आहे आणि याबाबतची कार्यवाही कधी पूर्ण होईल?, असे प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात विचारण्यात आले होते. आमदार शरद रणपिसे आणि अनंत गाडगीळ यांच्यासह अन्य आमदारांनी हे प्रश्न विधानपरिषदेत विचारले होते. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

गेल्या पाच वर्षांत एप्रिल २०१९ पर्यंत पोलीस विभागाच्या माहितीनुसार महामार्गावर एक हजार ५९३ अपघात झाले आणि त्यामध्ये ५१८ बळी गेले. तर ५९३ जण गंभीर रीत्या जखमी झाले. किरकोळ जखमींची संख्या १२८ एवढी आहे. पुणे जिल्ह्य़ातील मावळ तालुक्यात ओझर्डे येथे आपत्कालीन उपचार केंद्र आणि त्यावर हेलिपॅड बांधण्याच्या कामासाठी मे २०१२ रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात वुड स्टॉक हेलिकॉप्टर प्रा. लि या कंपनीची निवड करून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

जून २०१६ मध्ये केंद्राची तीन हजार ४०० चौ. फुटांची इमारत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यात आली. तसेच केंद्रावरील हेलिपॅड बांधण्याचे कामही पूर्ण झाले आहे. हे केंद्र चालवण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या इमारतीची डागडुजी करून हे केंद्र लवकरच सुरू करण्यात येईल. या कामासाठी विलंब झालेला नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.