बाबू गेनू चौकातील आरक्षित जागेवर, पदपथांवर आणि मंडई परिसरातील रस्त्यांवर पथारीवाल्यांनी केलेली सर्व अतिक्रमणे बुधवारी महापालिकेतर्फे धडक कारवाई करून हटवण्यात आली. या कारवाईनंतर बाबू गेनू चौकासह मंडई परिसर पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला.
बाबू गेनू चौकाजवळ एका मोठय़ा भूखंडावर सुपर मार्केटचे आरक्षण आहे. ही संपूर्ण जागा महापालिकेने ताब्यात घेतली असून जागेला कुंपणही घालण्यात आले आहे. मात्र, तेथे व्यवसाय करणाऱ्या काही विक्रेत्यांसह अनेक छोटय़ा-मोठय़ा विक्रेत्यांनी आरक्षित जागेलगत तसेच लगतच्या पदपथावर अतिक्रमण केले होते. त्यामुळे पदपथही बंद झाला होता. या संपूर्ण परिसरात बुधवारी कारवाई करण्यात आली.
बाबू गेनू ते महाराष्ट्र बँक या रस्त्यावरही कारवाई करण्यात आली आणि सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. मंडई परिसर काही दिवसांपूर्वी अतिक्रमणमुक्त करण्यात आला होता. तसेच तेथे पीएमपीचा थांबाही करण्यात आला असून तेथून पीएमपीची वाहतूकही सुरू झाली आहे. या मार्गात पुन्हा अडथळे निर्माण झाले होते. तसेच मंडई परिसरातही अतिक्रमणांना सुरुवात झाली होती. ही सर्व अतिक्रमणे बुधवारी हटवण्यात आली. संपूर्ण दिवसभरातील कारवाईत तीन ट्रक माल जप्त करण्यात आला.