महापालिका प्रशासनाकडून नोटिसांची जुजबी कारवाई

पुणे :  विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे आंबिल ओढय़ाची रुंदी वीस मीटरवरून पाच मीटर झाली असून दहा किलोमीटर लांबीचा ओढा अत्यंत जीवघेणा झाला आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली असतानाही महापालिका प्रशासनाकडून केवळ जुजबी कारवाई व्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पात्रालगतच्या ७७ बांधकांमाना केवळ नोटिसा देण्यात आल्या आहेत.

कात्रज तलावातून उगम पावणाऱ्या आणि दत्तवाडी येथे मुठा नदीला मिळणाऱ्या आंबिल ओढय़ाकाठच्या चौदा किलोमीटर परिसरातील शाळा, सोसायटय़ा, वसाहती, बंगल्यांना गेल्या वर्षी महापुराचा मोठा फटका बसला होता. महापुरानंतर आंबिल ओढय़ाची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने केली. त्याचा सविस्तर अहवालही करण्यात आला होता. या अहवालामध्येच आंबिल ओढा अतिक्रमणांमुळे आक्रसला असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ओढय़ाच्या उगमापासून वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत आंबिल ओढा अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. ओढय़ाच्या पात्रात झालेली अतिक्रमणे, इमारती, सोसायटय़ांनी बांधलेल्या सीमाभिंती, पात्रात टाकण्यात येत असलेला राडारोडा, यांमुळे ओढय़ाची रुंदी वीस मीटरवरून साडेचार ते पाच मीटरपर्यंत आली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणांमुळे आंबील ओढा आक्रसला आहे. त्यामुळे ओढा वाहात असलेल्या परिसरातील चाळीस ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आंबिल ओढा पात्राचे रुंदीकरण करावे, असे महापालिकेने सर्वेक्षण करून घेतलेल्या प्रायमूव्ह संस्थेने प्रस्तावित केले आहे.

किरकोळ कामे पूर्ण

भविष्यात पूरपरिस्थिती टाळण्यासाठी या भागात सीमाभिंती बांधणे, कल्व्हर्टची बांधणी आणि अन्य अनुषंगिक कामे करण्याचे प्रस्तावित आहे. आंबिल ओढा आणि दांडेकर पूल या परिसरात कल्व्हर्ट उभारण्याचे प्रस्तावित आहे. यातील किरकोळ कामे पूर्ण झाली आहेत.

क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून नोटिसा

कात्रज तलावापासून राजीव गांधी पार्क, लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी, विवेकानंद पुतळा, पद्मावती, कामगार कल्याण भवन, दांडेकर पूल या परिसरात ही अतिक्रमणे आहेत.  सर्वाधिक अतिक्रमणे धनकवडी परिसरात आहेत. यातील ७७ बांधकामांना महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून नोटिसा बजाविल्या आहेत.

उपाययोजनांची अंमलबजावणी नाही

आंबिल ओढय़ाला आलेल्या महापुरानंतर सर्वेक्षण, पाहणी दौरे करून विविध आराखडे करण्यात आले. जलवाहिन्या आणि सांडपाणी दुरुस्ती, अतिक्रमणे हटविणे, आंबिल ओढा पात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण, कल्व्हर्ट बांधणे अशा विविध उपाययोजनांचा यात समावेश आहे. यंदा पावसाळापूर्व कामाअंतर्गत आंबिल ओढय़ाच्या साफसफाईची कामे करण्यात आली. त्या व्यतिरिक्त अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नसल्याची वस्तुस्थिती आहे. पात्र रुंद करण्याच्या कामातही संथपणाच आहे.