News Flash

लोणावळा खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा, नातेवाईकांची मागणी

वीस दिवसांत हत्येचा तपास लागला नाही, तर रस्त्यावर उतरणार

सार्थकचे चुलते कैलास वाघचौरे आणि भाऊ विक्रांत वाघचौरे यांनी सोमवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण यांना निवेदन दिले.

लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयातील विद्य़ार्थी सार्थक दिलीप वाघचौरे आणि विद्यार्थिनी श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा, अशी मागणी सार्थकच्या कुटुंबियांनी केली आहे. सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येला एक महिना होत आला आहे. मात्र, या हत्येतील कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांच्या तपासातील दिरंगाईमुळे सार्थकचे चुलते कैलास वाघचौरे आणि भाऊ विक्रांत वाघचौरे यांनी सोमवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पुढील वीस दिवसांत हत्येचा तपास लागला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरणार असे त्यांनी म्हटले आहे.

३ एप्रिलला लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयातील विद्य़ार्थी आणि विद्यार्थिनीची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सार्थक दिलीप वाघचौरे (२२) आणि श्रुती डुंबरे (२१) या दोन विद्यार्थांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह हे विवस्त्र अवस्थेत आढळले होते. अज्ञाताविरोधात लोणावळा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती आरोपीविषयी कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत.

पोलीस जाणीवपूर्वक तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप सार्थकच्या चुलत्यांनी यावेळी केला. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच या प्रकरणी वीस दिवसात तपास केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून चोख उत्तर देऊ, असा इशारा सार्थकचा बंधू विक्रांत वाघचौरे याने दिला आहे. सार्थकच्या कुंटुंबियानी घेतलेल्या भूमिकेनंतर लोणावळा पोलीस दुहेरी हत्येप्रकरणाच्या तपासामध्ये गतीशीलता दाखविणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2017 2:37 pm

Web Title: engineering students lonavala murder case relative demands state cid inquiry
Next Stories
1 …आणि त्यांनी ‘स्काईप’वरुन घटस्फोट घेतला
2 जलयुक्त शिवार योजनेच्या अमंलबजावणीत पुणे जिल्हा अग्रेसर राहिल : गिरीश बापट
3 भारत-पाकने भूतकाळाचे तुरुंग फोडून बाहेर पडावे-सुधींद्र कुळकर्णी
Just Now!
X