करोना महामारीविरोधात लढा देताना रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय उपकरणांची देखील आता कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खास करोनाच्या उपचारांकरिता उपयोगात आणण्यासाठी पुण्यातील इंजिनिअर्स पोर्टेबल व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.

नोक्का रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीतील हे तरुण इंजिनिअर्स स्वस्त पोर्टेबल व्हेंटिलेटर्सच्या निर्मिती करण्यात व्यस्त आहेत. या व्हेंटिलेटर्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते कमी खर्चात आणि छोट्या आकारात बनवण्यात येणार आहे. तसेच करोनासारखा गंभीर आजार डोळ्यासमोर ठेवूनच याची निर्मिती केली जात आहे, या कंपनीचे सह-संस्थापक निखिल कुरेले यांनी याबाबत सांगितले. एएनआयने ट्विटद्वारे याची माहिती दिली.

कुरेले म्हणाले, आम्ही जे व्हेंटिलेटर तयार करीत आहोत त्याची किंमत ५०,००० रुपयांपेक्षा कमी असणार आहे. हे सर्व आजारांसाठी असं परिपूर्ण व्हेंटिलेटर नसेल. यामध्ये केवळ करोनाची लागण झालेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या बाबींचाच समावेश असेल.

भारतात सध्या केवळ ४८,००० व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. यांपैकी किती चालू स्थितीत आहेत याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, हे व्हेंटिलेटर्स सध्या आयसीयूमध्ये इतर आजारांवरील रुग्णांसाठी ते वापरले जात आहेत. त्यामुळे करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसाठी सध्या व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे व्हेंटिलेंटर्सच्या निर्मितीसाठी एआयआयएमएस, एम अँड एम, डीआरडीओ, टाटा ग्रुप यांसारख्या मोठ्या सरकारी आणि खासगी संस्थाही प्रयत्नशील आहेत.

सर्वात तरुण इंजिनिअर्सची धडपड

देशातील विविध प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजेस, आयआयटींमधून शिकलेले हे तरुण मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आणि एरोस्पेस इंजिनिअर्स व्हेंटिलेटर्स बनवण्यात व्यस्त आहेत. या सर्व तरुण इंजिनिअर्सचं वय सरासरी २६ वर्षे इतकं आहे. स्वस्त आणि देशांतर्गत व्हेंटिलेटर्सची कमी वेळेत निर्मिती करणे ही भारतासाठी सामान्य गोष्ट नाही.