राज्यातील अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पडताळणी २५ जूननंतर सुरू होणार असून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ७ जुलैनंतर सुरू होणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील महाविद्यालयांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. औषधनिर्माण शास्त्र शाखेची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता वाढली आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया २५ जूननंतर सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी जूनच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेची सुरूवात जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. ७ जुलैला एआयईईईचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावर्षीही राज्यात नवी महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी संपूर्ण संलग्नतेच्या अटीमुळे महाविद्यालयांची संख्याही कमी होणार आहे. त्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी राज्यात नेमक्या किती जागा असतील याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यात सध्या सुमारे ३५० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संख्येमध्ये राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.