आम्ही नुसती नजर जरी दिली तरी देखील लोकं आमच्या पक्षात येत असतील. तर त्याला आम्ही काय करणार? असे म्हणत भाजपात सुरू असलेल्या अन्य पक्षांच्या नेत्यांच्या प्रवेशांवर राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मत व्यक्त केले. तसेच, त्यांनी यावेळी हे देखील म्हटले की, तुमच्या नजरेने घाबरून इकडे येणारा थांबाला पाहिजे, मात्र ते न होता जर तो येतोच आहे तर त्याला आम्ही काय करणार? आम्ही भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेत नाही. ज्या नेत्यांचे विकासात योगदान आहे. अशाच नेत्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाकडून दबाव तंत्राचा वापर करून विरोधी पक्षातील नेते मंडळीना भाजपात घेतले जात आहे, या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? असे विचारले असता तावडे म्हणाले की, आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचा मुख्यमंत्री होणार असून आम्ही ‘अब की बार २२० के पार’ जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या मुद्दयावर बोलताना त्यांनी सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे लवकरच आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.