पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे पुरेसं पोलीस मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ‘ग्रामरक्षा दल’ ही संकल्पाना पुढे आणली आहे. या संकल्पनेद्वारे सामान्य नागरिकांवर सामाजिक सुरक्षेची जबाबदारी देण्यात येणार असून यासाठी त्यांना रायफलचे परवाने देखील देण्यात येणार आहेत. लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना आयुक्तांनी ही माहिती दिली.

आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळ कमी असल्याने अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. शहरात घरफोडी, वाहन चोरी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे दररोज घडत आहेत. प्रत्येक गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस पोहोचू शकतील असे नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी राबवलेली ‘ग्रामरक्षा दल’ संकल्पना आता शहरात राबवण्यात येणार आहे. समाजाच्या सुरक्षेसाठी गस्त घालण्याची तयारी असलेल्या आणि रायफल विकत घेण्याची ऐपत असलेल्या व्यक्तीला याचा परवाना मिळणार आहे. मात्र, यासाठी इच्छुकांचं संपूर्ण रेकॉर्ड तपासण्यात येईल.”

‘काही विशिष्ट लोकांनाच पिस्तूल परवाना देण्याऐवजी समाजाच्या सुरक्षेसाठी ग्रामरक्षा दलात (व्हिलेज डिफेन्स पार्टी) गस्त घालण्याची तयारी दर्शवणाऱ्या व्यक्तीला रायफलचा परवाना आम्ही देणार आहोत. मात्र, त्यासाठी असलेल्या नियमांनुसार त्या संबंधित व्यक्तीचं गुन्हेगारीचं रेकॉर्ड नसलं पाहिजे तसेच त्याची रायफल विकत घेण्याची ऐपत पाहिजे. मात्र, सर्वांना सरसकट याचा परवाना दिला जाणार नाही. याचा वापर संबंधित व्यक्तीनं व्यक्तिगत सुरक्षेऐवजी गावाच्या सुरक्षेसाठी करावं लागेल. गस्तीसंदर्भात मुंबई पोलीस अॅक्ट ६३ प्रमाणे १८ ते ५० वय असलेल्या व्यक्तीला पोलीसप्रमुख असे आदेश देऊ शकतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहरी बरोबरच काही ग्रामीण भागही आहे. त्यामुळे ग्रामरक्षा दलाची निर्मिती करणे आवश्यक आहे, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे अधिकार पोलीस प्रमुखांना आहेत,” असे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

ग्रामरक्षा दल आणि रायफल परवाना हे दोन वेगळे भाग आहेत. शहरातील गुन्हेगारीत वाढ झालेली नाही. सर्व प्रकारचे गुन्हे मिळून शहरात यावर्षी ७ हजार ६५६ गुन्हे दाखल झालेले आहेत. गेल्या वर्षी याच काळात १३ हजार ६५ गुन्हे दाखल झाले होते. म्हणजेच यंदा निम्म्यापेक्षा कमी गुन्हे झालेले आहेत. शहरात पोलीस चांगलं काम करत आहेत, हे नागरिकांच्या मनात रुजवायचं आहे. सामाजिक सुरक्षेसाठी, वारंवार गुन्हे घडत असलेल्या ठिकाणी तेथील नागरिकांनी रायफल परवाण्यासाठी अर्ज केल्यास रितसर प्रक्रियेद्वारे त्यांना परवाना देणार आहेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.