30 October 2020

News Flash

बारावीच्या परीक्षेत बदल करायचे का ते तज्ज्ञांनी ठरवावे – विनोद तावडे

राज्यमंडळ अकरावीची आणि बारावीची परीक्षा स्वतंत्रपणे त्यावर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारितच घेते.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे

‘वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ५ ते ६ हजार जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उरलेल्या लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धती बदलावी का, याबाबत तज्ज्ञांनी निर्णय घ्यावा,’ असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
पुढील वर्षीपासून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बंधनकारक असणाऱ्या ‘नीट’ मुळे केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि राज्यमंडळ यांच्या परीक्षांमधील तफावतीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्याबाबत विचारले असता तावडे म्हणाले,‘‘सीबीएसई आणि राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमात काहीही फरक नाही. परीक्षा पद्धतीत मात्र काही फरक आहेत. सीबीएसई अकरावी आणि बारावी दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम गृहीत धरून विद्यार्थ्यांची परीक्षा घेते आणि राज्यमंडळ अकरावीची आणि बारावीची परीक्षा स्वतंत्रपणे त्यावर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारितच घेते. त्याचप्रमाणे परीक्षा पद्धतींमध्ये काही फरक आहेत. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ५ ते ६ हजार जागा आहेत. त्यासाठी काही लाख मुले परीक्षा देतात. उरलेल्या ५ ते ६ लाख विद्यार्थ्यांसाठीही परीक्षा पद्धतीत बदल करायचे का याचा विचार शिक्षणतज्ज्ञांनी करावा. त्याबाबत राज्यमंडळाच्या अध्यक्षांशी बोलणे झाले आहे.’’ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ‘ऑल इंडिया कोटा’ हा फक्त राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून भरण्यात येणार नसून त्यासाठी जेईई दिलेल्या विद्यार्थ्यांना मिळणारी संधीही कायम आहे. सीईटी आणि जेईई अशा दोन्ही परीक्षांचा या कोटय़ासाठी विचार करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. पूर्व प्राथमिक शिक्षण हे सध्या बालकल्याण विभागाकडे असून ते शिक्षण विभागाच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही तावडे या वेळी म्हणाले.

‘क्रीडा स्पर्धाचे निकाल संकेतस्थळावर जाहीर करणार’
‘बोगस क्रीडा प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व क्रीडा स्पर्धाचे निकाल संकेतस्थळावर जाहीर करणार. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात येत आहे, जेणेकरून बोगस क्रीडा प्रमाणपत्रे दाखवून लाभ घेण्याला आळा बसेल. त्याचप्रमाणे, क्रीडा पुरस्कारांची यादी अंतिम झाली की तीही आक्षेप नोंदवण्यासाठी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल,’ अशी घोषणा तावडे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 1:51 am

Web Title: experts to decide whether to change in hsc examination says vinod tawde
Next Stories
1 ‘काव्यफुले सावित्रीची’ संग्रहातील कवितांची निवड करणारे जाधव सर..
2 संवादिनीवादक सीमा शिरोडकर यांना यंदाचा स्वर-लय-रत्न पुरस्कार जाहीर
3 पुण्यातील सीबीएसई शाळांचा निकाल वाढला
Just Now!
X