पुनर्मूल्यांकनानंतर विद्यापीठाच्या कारभाराचा घोळ उघडकीस; निकाल मिळण्यास उशीर होत असल्याने विद्यार्थी हैराण

परीक्षा, वेळापत्रक, निकालातील चुका, लांबणारे निकाल, पुनर्मूल्यांकनाचे निकाल या मुद्दय़ांवरून हजारो विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्राला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्याचाच एक नमुना नुकताच समोर आला आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमाला एका विषयात ९ गुण देऊन अनुत्तीर्ण करण्यात आलेल्या विद्यार्थिनी पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण तर झालीच मात्र महाविद्यालयातली अव्वल आली आहे. असे प्रकार वारंवार घडू लागल्याने विद्यापीठाच्या एकूण कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्यवस्थापन विद्याशाखेच्या ‘मास्टर्स इन मार्केटिंग मॅनेजमेंट’ (एमएमएम) या अभ्यासक्रमाला सलग तीन सत्रे पहिल्या आलेली एक विद्यार्थिनी चौथ्या सत्रात एका विषयात अनुत्तीर्ण झाली. अनुत्तीर्ण झालेल्या विषयात तिला अवघे ९ गुण होते. शेवटच्या सत्राला अनुत्तीर्ण झाल्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. पुनर्मूल्यांकनाला उत्तरपत्रिका दिल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर तिच्या हाती तिचा निकाल आला. निकाल मिळवण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे, नंतर पुढील अर्ज भरणे ही सगळ्या प्रक्रियेसाठी साडेचारशे रुपये खर्च आणि परगावी राहत असल्यामुळे विद्यापीठात चौकशीसाठी खेटे घालणे हा सगळा मनस्ताप सहन करावा लागला. ‘आपण परीक्षेत अनुत्तीर्ण झालो’ या भावनेमुळे नैराश्याला सामोरे जावे लागले. पुनर्मूल्यांकनाच्या निकालानंतर या विद्यार्थिनीला अनुत्तीर्ण झालेल्या विषयांत पन्नास पैकी २२ गुण मिळाल्याचे समोर आले आणि या सत्रातही ती महाविद्यालयात पहिली आली.

नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर या विद्यार्थिनीने सांगितले, ‘मी तीन सत्रांत महाविद्यालयात पहिली आले होते. मात्र चौथ्या सत्रात एका विषयांत अनुत्तीर्ण असल्याचे दिसले. पुनर्मूल्यांकनाचा निकाल मिळण्यासाठी खूप वेळ गेला. त्यानंतर मी उत्तीर्ण झाले मात्र तीन महिने खूप मनस्तापाचे होते.’

परीक्षांच्या जोडीनेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनांचा हंगाम सुरू होतो. परीक्षेच्या वेळापत्रकातील गोंधळ, प्रश्नपत्रिकेतील चुका यासाठी परीक्षेच्या काळातही विद्यार्थ्यांना आंदोलन करा, निवेदने द्या, विद्यार्थी संघटनांबरोबर घोषणाबाजी करा अशी वेळ येते. परीक्षा झाल्यानंतर निकालातील चुका, पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर न मिळणे, छायाप्रती वेळेवर न मिळणे अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना आंदोलनाचे निमित्त देतात. गेली किमान तीन वर्षे प्रत्येक सत्रात विद्यापीठात हे आंदोलन सत्र सुरू आहे. मात्र अद्यापही परीक्षा विभागाच्या कारभारावर विद्यापीठाला तोडगा मिळालेला नाही.

मनस्ताप आणि अर्थिक भरुदडही

विद्यापीठाच्या परीक्षा उशिरा होणे, पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेत न मिळणे, छायाप्रती न मिळणे या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहेच. पण त्याचबरोबर आर्थिक भरुदडही सहन करावा लागत आहे. पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेत न मिळाल्यामुळे पुढील परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागते. मुळात पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती घ्याव्या लागतात त्याचेही स्वतंत्र शुल्क आहे. पुनर्मूल्यांकनात निकाल बदलला, तर विद्यार्थ्यांचे शुल्क परत देण्याचा नियमही आता विद्यापीठाने काढून टाकला आहे. त्यामुळे चूक नसूनही हजारो विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचबरोबर निकाल वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीही गमावण्याची वेळ आली आहे.

निकालांना विलंब

या सत्रातही पुनर्मूल्यांकनाचे निकाल लांबलेले आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांना निकाल मिळालेले नाहीत. या वर्षी पुनर्मूल्यांकनाचे शुल्क कमी केल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर अर्ज आले आहेत. त्यामुळे निकालाला वेळ लागत असल्याची माहिती परीक्षा विभागातील सूत्रांनी दिली. मान्यताप्राप्त आणि पात्र शिक्षकांकडून उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन होत नाही. त्यामुळे निकालात चुका होतात,’ असा आरोप व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या शिक्षकांनी केला आहे.