आळंदीच्या नवीन पुलाचा लोखंडी कठडा तोडून तवेरा मोटार इंद्रायणी नदीत वाहून गेल्याची घटना मंगळावारी दुपारी घडली. या मोटारीमध्ये चार ते पाच व्यक्ती असण्याची शक्याता आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी, आळंदी, एमआयडीसी अग्निशामक दलाच्या जवान आणि एनडीआरएफचे जवान अशा दोनशेच्या पथकाने रात्री पावणेनऊपर्यंत मोटारीचा शोध घेतला. पण, मोटार व त्यातील व्यक्ती सापडलेल्या नाहीत. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा शोधमोहीम घेण्यात येणार आहे.
पुण्याकडून आळंदीकडे तवेरा मोटार निघाली होती. आळंदी येथील नवीन पुलावर मोटारीने लोखंडी कठडा तोडून शेजारच्या पुलाला धडकली आणि दोन्ही पुलामधून इंद्रयाणी नदीत पडली. ही मोटार पडताना मासे पकडण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी पाहिले आणि आरडाओरडा केला. तसेच मोटारीतील व्यक्तींना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना पाण्याच्या वेगामुळे शक्य झाले नाही. मोटार पडल्याची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दलास कळविण्यात आले. काही वेळातच पुणे, आळंदी, पिंपरी-चिंचवड, एमआयडीसी येथील अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. तीन वाजल्यापासून रात्री पावणेनऊपर्यंत हे शोधकार्य सुरू होते. पण, मोटारीचा व त्यातील व्यक्तींचा शोध लागला नाही. घटनास्थळाची उपजिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी येऊन पाहणी केली.
याबाबत पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचे प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले, की दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांकडून मोटार नदीत पडल्याची फोन आला. त्यानुसार पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर पुणे, एमआयडी अग्निशामक दलाच्या गाडय़ा आल्या. सर्वानी गळ सोडून, पाण्यात बोटीने मोटारीचा शोध घेतला. मात्र, पाण्याचा वेग असल्याने शोध लागलेला नाही. नदीत पडलेली मोटार ही तवेरा होती की सुमो होती हे निश्चित माहिती मिळालेली नाही. दोन्ही पुलाच्या मध्ये ही मोटार पडली असून यात किती व्यक्ती होत्या, याची निश्चित माहिती मिळालेली नाही. आळंदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. एम. देशमुख यांनी सांगितले, की पुण्याकडून आळंदीकडे ही मोटार येत होती. या मोटारीचा शोध रात्री पावणेनऊपर्यंत घेतला. पण, मोटार आणि त्यातील व्यक्तींचा शोध लागलेला नाही. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले आहे.