महाराष्ट्रात  शेतकऱ्याला पाण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येते ही बाब दुर्दैवी आहे असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना समान पाणी पुरवठा मिळाला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसेच आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी असेही त्यांनी म्हटले आहे.

इंदापूर येथील इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या इतर प्रश्नांवरही भाष्य केले. मागील चार वर्षांपासून म्हणजेच भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात स्त्री भ्रूण हत्या वाढल्या आहेत. महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत असे नीती आयोगाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यावरून सरकार कशा प्रकारे कारभार करते ते दिसून येते आहे असेही त्यांनी स्पष्ट केले

महिला पत्रकाराबद्दल फेसबुक वर राष्ट्रवादीचा पदाधिकारी सुरुज चव्हाण याच्या अश्लील वक्तव्य पक्ष काय कारवाई करणार यावर त्या म्हणाल्या की, सुरज चव्हाण ला पक्षाने नोटीस पाठवली असून त्याने दिलगिरी व्यक्त करून पोस्ट डिलीट केली आहे.त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वसन त्यांनी यावेळी दिले.

२५ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सरकारविरोधात आंदोलन करणार आहे. एनडीए प्रशासनाकडून जनतेला जो त्रास होतो आहे त्याविरोधात हे आंदोलन असणार आहे असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. नाणार प्रकल्पाबाबत त्यांना विचारले असता, शरद पवार हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते नाणारला जातील आणि तिथेच ते आपली भूमिका स्पष्ट करतील असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.