पाऊस संपून थंडी सुरू होणार असल्याने सर्दी, खोकला, ताप, सारी अशा आजारांमध्ये वाढ होणार आहे. नवरात्र, दिवाळी आणि नाताळ यांसारखे मोठे सण आणि टाळेबंदी शिथिलता अंतर्गत सर्वच क्षेत्रे खुली होत आहेत. परिणामी पुण्यात डिसेंबर, जानेवारीमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या रुग्णसंख्या कमी होत असली, तरी दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत महापालिका आणि कटक मंडळांसह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १६ टक्के  आहे.

करोनाच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पाऊस संपून थंडी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत

सतर्क राहण्याबाबत सूचना आल्या आहेत. दरवर्षी थंडीमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि सारी या आजारांमध्ये वाढ होत असते. त्यानुसार यंदा थंडीमध्ये या आजारांच्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नवरात्र, दिवाळी आणि नाताळ या मोठय़ा सणांनिमित्त नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डिसेंबर, जानेवारीमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.’ असेही त्यांनी सांगितले.