पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. ठेवींची रक्कम मुदतपूर्व परत करण्यावर तसेच मोठय़ा रकमेच्या ठेवी स्वीकारण्यावर तसेच सध्या बँकेकडे असलेल्या ठेवींवर कर्ज देण्यावर निर्बंध घालण्यात आले असून तसे आदेश रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकेला पत्र पाठवून  दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व शाखा व्यवस्थापकांना सोमवारी पत्र पाठवले आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आर्थिक अनियमितता, नियमबाह्य़ कर्जवाटप प्रकरणी सहकार विभागाकडून सध्या कारवाई सुरू आहे. मध्यंतरी बँकेच्या काही अधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर आरबीआयने बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. आरबीआयकडून बँकेला २५ एप्रिल रोजी पत्र देण्यात आल्याचा उल्लेख बँकेने शाखा व्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

आरबीआयने दिलेल्या आदेशानुसार आरबीआयकडून पुढील आदेश येईपर्यंत बँकेकडे असलेल्या मुदतठेवींच्या रकमा मुदतपूर्व बंद करून अदा करता येणार नाहीत तसेच मुदतठेवींवर कोणत्याही प्रकारचे कर्ज ठेवीदारांना देता येणार नाही. मोठय़ा रकमेच्या ठेवी बँकेने स्वीकारू नयेत, तसेच जुन्या मोठय़ा रकमेच्या ठेवींचे नूतनीकरण करू नये, असे आदेश बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इतर शाखांच्या शाखा व्यवस्थापकांना दिले आहेत. तसेच याबाबतची माहिती बँकेचे ठेवीदार, खातेदार, कर्जदार यांना देण्यात यावी, असेही आरबीआयच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.