मोशी येथे वाढदिवसाच्या मध्यरात्री फटाके फोडणाऱ्या बर्थडेबॉयला दंड ठोठावल्याचे वृत्त आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टाने त्याला ५०० रुपयांचा दंड केला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी संबंधित बर्थडेबॉयला ताब्यात घेतले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, सागर बाळशीराम पराड (वय २०, रा. द्वारका सोसायटी, मोशी) असे दंड ठोठावलेल्या बर्थडेबॉयचे नाव आहे. सागरचा १ जून रोजी वाढदिवस होता. या दिवशी मध्यरात्री त्याने मित्रांसोबत फटाके वाजवले आणि मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला. परंतू, वाढदिवस साजरा करताना मोठ्या आवाजाचे फटाके वाजवण्यात आले होते. याचा आपल्याला मोठा त्रास झाल्याची तक्रार शेजारी राहणाऱ्या नागरिकांना केली होती.

या तक्रारीनुसार भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन संबंधीत बर्थडेबॉयला ताब्यात घेतले होते तसेच त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने ५०० रुपये दंड ठोठावला. सागरवर मुंबई पोलीस कायद्यानुसार खटला दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, तलवारीने केक कापणाऱ्या अनेक बर्थडेबॉईजवर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्याचा आसुरी आनंद घेणाऱ्या तरुणांना यामुळे नक्कीच चाप बसेल अशा प्रतिक्रिया सामान्यांकडून व्यक्त होत आहेत.