News Flash

बाजारभेट : फरशी, मार्बल आणि ग्रॅनाइटची बाजारपेठ

शहराच्या विस्ताराबरोबर ही बाजारपेठ देखील सात-आठ ठिकाणी विखुरली आहे.

पुण्यातील व्यवसायाचा वेध घेता हा व्यवसाय पूर्वी मंगळवार पेठेत होता. मात्र नंतर तो तेवढय़ापुरता मर्यादित न राहता तो अन्य भागात विस्तारला. टिंबर मार्केट, पिसोळी, हडपसर, काळेवाडी, पिंपरी, भोसरी, चिंचवड, नगर रस्ता, आंबेगाव या परिसरात मुख्यत्वे हमरस्त्यांच्या परिसरात आणि नागरी वस्तीपासून थोडा दूर असा हा बाजार विस्तारला आहे.

कोणत्याही वस्तूच्या, साहित्याच्या बाजारपेठेत भ्रमंती केली, सजगतेने संवाद साधला, की दोन-तीन भेटीतच त्या बाजारपेठेचे अंतरंग स्पष्ट होऊ लागते. अर्थातच, बाजारपेठ आणि तेथील व्यवहार, विक्रीच्या वस्तू, यावर तत्कालीन जीवनमानाचे प्रतिबिंब हे स्वाभाविकपणे प्रत्ययास येते. टाइल्स, ग्रॅनाइट, मार्बलच्या बाजारपेठेत भ्रमंती करताना, याच गोष्टीचा पुन:प्रत्यय आला. शहराच्या विस्ताराबरोबर ही बाजारपेठ देखील सात-आठ ठिकाणी विखुरली आहे.

माणसाच्या सर्वागीण विकासाबरोबर त्याची अभिरुची बदलणे, जीवनमान उंचावणे, निवास व्यवस्था अत्याधुनिक होणे हे अपेक्षित असते. आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक जण घराच्या भक्कमपणाबरोबर सुंदर आकर्षकतेकडेही लक्ष पुरवतो. फरशा, टाइल्स, ग्रॅनाइट, मार्बल या वस्तूंच्या बाजारपेठेत फिरताना गोरगरिबांच्या चंद्रमौळी घरापासून सेन्सॉर आणि व्हिडिओ डोअरफोन अशा अत्याधुनिक सेवासुविधांच्या बाजारपेठेचा धावता आढावा घेता आला.

मंगळवार पेठेतील गाडीतळ परिसर आणि लगतच्या सोमवार पेठेत या बाजारपेठेची सुरुवात झाल्याचे मानले जाते. हा काळ साधारणपणे १९३०च्या आसपासचा आहे. विश्वनाथ अ‍ॅण्ड कंपनी (गवंडी), शहाबाद स्टोन (आरोळे), लक्ष्मी स्टोन (इंजतकर), हणमंतराव अ‍ॅण्ड सन्स (शिंगाडे), लादीवाले साठे, श्रीकृष्ण बाहेती, माधवराव अ‍ॅण्ड कंपनी (आढाव) अशी सुमारे दहा दुकाने याच परिसरात केंद्रित होती. रेल्वेने येणारे अवजड साहित्य उतरून घ्यायला आणि साठवणुकीला हा भाग त्या वेळी सोयीचा ठरल्याने याच भागात व्यापार केंद्रित झाला असावा, असे कांतिलाल ओसवाल यांचे मत आहे.

या व्यवसायासाठी आवश्यक तो कच्चा आणि तयार माल रफ शहाबाद, मार्बल, मुख्यत्वे राजस्थानमधून तर ग्रॅनाइट, आंध्र, तामिळनाडू, ओरिसा, कर्नाटक येथून येतो. गुजरातमधील मोरबी आणि हिंमतनगर येथील टाइल्स देशभरात प्रसिद्ध आहेत.

पूर्वी घरामध्ये जमिनीवर (फ्लोअरिंग) मुख्यत्वे फरशीचा वापर होत होता. दगड-विटांच्या भिंती आणि छतावर कौले, पत्रे वापरले जायचे. आता अशी घरे ग्रामीण भागातही अभावानेच दिसतात. फरशी प्रकारात आधुनिकता आणि आकर्षकता वाढली. फरशी, मार्बल, ग्रॅनाइट यापुढे जाऊन इंजिनिअर क्वार्ट्झ, इंजि. मार्बल, सिंथेटिक लाइट, नॅनो पॉलिश, व्हाइट पॉलिश्ड आणि व्हेट्रिफाइड टाइल्स असे प्रकार आता प्रचलित आहेत. गुजरातमधील विशिष्ट मातीपासून पूर्णपणे कृत्रिम अशा विविध आकारांच्या टाइल्स हे सध्याचे या व्यवसायातील अद्ययावत स्वरूप असल्याचे सांगितले जाते. व्यवसायाचे स्वरूप आणि त्यातील साहित्यामध्ये झालेले बदल हे मुख्यत्वे गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या काळातील आहेत. शहाबादी फरशी, प्रक्रिया केलेल्या चकचकीत रंगीत फरशा, रंगसंगतीतून केलेली नक्षीदार मांडणी, ग्रॅनाइट, मार्बल यांचा दिमाखदार वापर आणि त्यानंतर आला तो पूर्णपणे कृत्रिम टाइल्सचा जमाना.

पुण्यामध्ये या व्यवसायात चारशे व्यावसायिक आहेत, अशी माहिती व्हीनस ग्रॅनाइटचे सतीश शिंगाडे आणि संदीप शिंगाडे यांनी दिली. विक्रेते, कारागीर, मजूर अशा सर्वाचा विचार करताना सुमारे सात-आठ हजारांची उपजीविका या व्यवसायावर पूर्णपणे अवलंबून असल्याचे लक्षात येते. व्यापाऱ्यांची संघटना, ‘पुणे टाइल्स अ‍ॅण्ड सॅनिटरीवेअर डीलर्स असोसिएशन’ या नावाने अस्तित्वात होती. लालचंद जैन, मकरंद अभ्यंकर, अशोक ओसवाल हे पदाधिकारी होते. नवीन कायदे जाणून घेणे, समस्यांची मांडणी अशा मर्यादित विषयांपुरते संघटनेने कार्य केल्याचे समजले. बाजारपेठेची माहिती मिळवताना गणेश टोकेकर या कलाकाराने काही उपयुक्त माहिती दिली. अलीकडच्या काळात नव्याने उभारलेल्या मंदिरांच्या कलाकुसरीसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. स्मृतिचिन्हांसाठी मार्बल आणि ग्रॅनाइटचा प्रथम वापर त्यांनी सुरू केला. इंदिरा गांधी यांच्या स्मारक उभारणीच्या निमित्ताने केरळमधील काळय़ा ग्रॅनाइटच्या खाणींचा शोध लागला. दगडांच्या खाणीमध्ये शासकीय नियमानुसार ४५ फुटांपर्यंतच खोदाई करता येते. फरशी, दगड यांच्या व्यवसायात एक कणही वाया न जाता त्यांचा वापर दुय्यम उत्पादनांसाठी केला जातो, अशी माहिती टोकेकर यांनी दिली. पूर्वी केवळ राजेरजवाडय़ांच्या वास्तू आणि मंदिरांसाठी वापरले जाणारे मौल्यवान दगड आणि कारागिरी आता अनेकांच्या आवाक्यात आली आहे. स्मारके आणि कोनशिला यांच्या अस्तित्वाने व्यवसायाचे महत्त्व कालातीत आहेच, परंतु त्याबरोबरीने घर आणि भिंती सजवण्यासाठी या व्यवसायाच्या कक्षा विस्तारल्या आहेत.

बाजारपेठा या मानवी विकासाच्या, परिवर्तनाच्या, जीवनशैलीच्या मापदंड मानल्या जातात. अर्थकारण हे केंद्रस्थानी असले, तरीही त्यावर परिणाम करणारे घटक हे मानवी भावनांशी निगडित असतात. फरशी, दगड, मातीशी निगडित अशा या व्यवसायाचा परामर्श घेताना हाच विचार मनामध्ये ‘घर’ करून राहतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 4:39 am

Web Title: flooring marble granite market pune market mangalwar peth pune
Next Stories
1 ‘जीएसटी’नंतरच्या विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या!
2 स्वरभास्कर पुरस्काराचा महापालिकेला विसर
3 जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कारने घेतला पेट
Just Now!
X