मागील चार महिन्यांपासून करोना लॉकडाउनमुळे विविध क्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. असाच परिणाम कला क्षेत्रावर देखील झाला असून लोककला सादर करणाऱ्या लावंतांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, राज्यात हळूहळू उद्योग-व्यवसायांना सुरुवात होत असल्याने आता आम्हालाही कला सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक कला थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी राज्य शासनाने केली.

जाधव म्हणाले, “राज्याच्या अनेक भागात लावणी कला केंद्रे असून जवळपास १० हजारांहून अधिक कलाकार, अनेक भागात जाऊन रसिक प्रेक्षकांसमोर लावणी सादर करण्याचे काम करतात. यातूनच कलाकार मंडळींचं दैनंदिन जीवन जगणे शक्य होते. मात्र, यंदा ऐन यात्रा, जत्रांच्या काळातच आलेल्या करोनाच्या साथीमुळे कोणत्याही गावात यात्रा झाली नाही. यामुळे तमाशाचे प्रयोग करता आले नाहीत. आता चार महिने होत आले असून आमची कलाकार मंडळी यामुळे अत्यंत कठीण परिस्थितीमधून जात आहेत.”

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ज्या प्रकारे लॉकडाउन शिथिल करून इतर व्यवसायांना परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे आम्हाला देखील नियम आणि अटींद्वारे सांस्कृतिक केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच कलावंत मंडळीना, राज्य शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लोककला थिएटर मालकांनी केली आहे.

लोककला आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. यामुळे कलाकारांना आर्थिकदृष्ट्या उभं राहण्यास खर्‍या अर्थाने मदत होईल. तसेच कलाकारांसाठी सांस्कृतिक केंद्रही उभारले जावे. या सर्व मागण्यांची दखल राज्य शासनाने घेऊन करोनाच्या संकटातून कलाकार मंडळींना बाहेर काढावे अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.