नैर्ऋत्य मोसमी वारे शनिवारी देशाच्या वेशीवर दाखल झाले असताना रविवारी राज्यात अनेक भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. परिणामी काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले, तर उष्णतेच्या लाटेमुळे होरपळणाऱ्या भागांना तापमान घसरल्याने दिलासा मिळाला.

मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील सांगलीत गारपीटही झाली. वादळामुळे काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाल्याने तीव्र उष्म्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. आणखी तीन ते चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

पुण्याला झोडपले

पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि परिसराला संध्याकाळी सहानंतर पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री आठपर्यंत पावसाच्या सरी आणि विजांचा कडकडाट सुरू होता. संपूर्ण शहरात आणि जिल्ह्य़ातील बहुतांश ठिकाणी सुमारे दीड तास जोरदार सरी बरसल्या.

सांगलीत गारपीट

सांगली जिल्ह्य़ातील पूर्वेकडील अनेक तालुक्यांत सायंकाळी जोरदार वारा आणि गारांच्या माऱ्यासह मुसळधार पाऊ स पडला. प्रामुख्याने कवठे महाकाळ, तासगाव तालुक्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस झाला. गारांचा मारा मोठय़ा प्रमाणावर  झाला. त्यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा शहरासह जिल्ह्य़ातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. दुपारी सातारा शहरासह वाई, पाचगणी, महाबळेश्वर आदी भागांत जोरदार पाऊस झाला.

औरंगाबादमध्ये वादळी पाऊस

औरंगाबादमध्ये सायंकाळी वादळी-वाऱ्यासह पाऊस झाला. जाधववाडीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या व्यापारी संकुलाचा पत्र्याचा भाग कोसळला. काही ठिकाणचे मोठे फलक कोसळले. शहरातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तासभराच्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. उस्मानाबाद शहर आणि परिसरात पहाटे जोरदार सरी बरसल्या.

नगरमध्ये सोसाटय़ाचा वारा

नगर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, जिल्ह्यात विविध ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस पडला. कोपरगाव, अकोला येथे जोरदार सरी बरसल्या. राहता, शिर्डी, बाभळेश्वर या भागांत वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. सोलापूर शहरात पहाटे हलका पाऊस पडला.

रत्नागिरी जिल्ह्य़ात सरी

कोकणवासीयांना प्रतीक्षा असलेल्या पूर्वमोसमी सरी रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात कोसळल्या. खेड, चिपळूण, गुहागर आणि संगमेश्वर या चार तालुक्यांमध्ये पाऊस झाल्याने उकाडा कमी होऊन हवेत सुखद गारवा निर्माण झाला. पुढील काही दिवसांत अशाच प्रकारे पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे.

चक्रीवादळाची शक्यता, मच्छीमारांना इशारा 

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असून, त्यामुळे मुंबई आणि कोकणात पावसाच्या सरी कोसळतील. तसेच समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होत असल्याचा अंदाज आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटरवर असेल.

मुंबई परिसरात शिडकावा

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील काही भागांत रविवारी रात्री पावसाचा शिडकावा झाला. गोवंडी, विलेपार्लेसह ठाण्यातील राबोडी, खारेगाव, नवी मुंबईतील महापे येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

राज्याच्या विविध भागांत पुढील तीन ते चार दिवसांत पूर्वमोसमी सरी कोसळतील. सोमवारी संपूर्ण राज्यात सोसाटय़ाचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

११ ते १३ जूनच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.