शरद पवार यांची टिप्पणी

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे ‘ते’ विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

‘देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचारलं तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही.’ या माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांच्या विधानावर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना काळजी व्यक्त केली.

पवार म्हणाले, गेल्या आठवड्यात माझ्या वाचनात आले होते, की देशातील न्यायव्यवस्था उच्च आहे. न्यायाधीश यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी हा उल्लेख केला होता. त्याबाबत आनंद झाला; पण गोगोई यांचे विधान धक्कादायक आहे. त्यांनी न्याय व्यवस्थेबाबत त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला का, हे मला ठाऊक नाही. पण, त्यांचे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणार आहे.

त्यांच्याबद्दल काय बोलणार

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आणि धनंजय मुंडेप्रकरणी शरद पवार गप्प का आहेत, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे, त्याकडे लक्ष वेधले असता ‘ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते त्यांच्याबद्दल मी काय बोलणार?’ असा प्रतिप्रश्न शरद पवार यांनी केला.