वादात मध्यस्थी केल्याने चिडलेल्या टोळक्याने उपाहारगृहाच्या चालकाला मारहाण करून तोडफोड करणाऱ्या चौघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. वडगाव शेरी येथे रात्री ही घटना घडली.पंकज गोपाळ गवळी (वय २०), योगेश संतोष काळे (वय २०), दिनेश दिलीप मांडेकर (वय १९), अक्षय ऊर्फ रॉनी सुभाष बनकर (वय २२, चौघे रा. वडगाव शेरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अमोल जाधव (वय २०, रा. वडगाव शेरी) याने यासंदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि अमोल जाधव हे ओळखीचे आहेत. जाधव याचे वडगाव शेरीत चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचे उपाहारगृह आहे. जाधव याचा मित्र सागर आणि आरोपींमध्ये भांडणे झाली होती. जाधव याने मध्यस्थी केल्याने आरोपी त्याच्यावर चिडले होते. शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी गवळी, काळे, मांडेकर, बनकर तेथे आले. त्यांनी जाधव आणि कामगारांना मारहाण केली.