News Flash

अजूनही ‘फुलराणी’मध्ये बसण्याची ओढ

लहानग्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली पेशवे उद्यानातील फुलराणी ही छोटेखानी रेल्वे गुरुवारी (८ एप्रिल) ६५ वर्षे पूर्ण करीत आहे.

पेशवे उद्यानातील ‘फुलराणी’ला आज ६५ वर्षे पूर्ण

पुणे : साडेतीन वर्षांची लहान मुलगी असताना उद्घाटन केलेल्या ‘फुलराणी’मध्ये बसण्याची मला अजूनही ओढ वाटते. हवेत धुरांच्या रेषा काढणाऱ्या ‘झुकझुक झुकझुक अगीनगाडी’च्या प्रवासाची प्रचिती देणाऱ्या फुलराणीमध्ये नातवंडांसमवेत प्रवास करण्याचा आनंद लुटते, अशी भावना पेशवे उद्यानातील फुलराणीचे उद्घाटन करणारी त्या वेळची चिमुकली वसुंधरा डांगे आणि सध्याच्या सुगंधा शिरवळकर यांनी व्यक्त केली.

लहानग्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली पेशवे उद्यानातील फुलराणी ही छोटेखानी रेल्वे गुरुवारी (८ एप्रिल) ६५ वर्षे पूर्ण करीत आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातून पेशवे उद्यान बंद असल्याने फुलराणीचा वाढदिवस साजरा होणार नाही. मात्र, यानिमित्ताने फुलराणीचे उद्घाटन करणारी त्या वेळची चिमुकली वसुंधरा डांगे आणि प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी सुगंधा शिरवळकर यांनी फुलराणीच्या आठवणींना उजाळा दिला.

दारूवाला पुलाजवळ समर्थ व्यायाम मंडळासमोरील महापालिकेच्या बालवाडीमध्ये मी होते. वर्गातील सर्वांत धीट मुलगी म्हणून पेशवे उद्यानामध्ये सुरू करण्यात आलेल्या फुलराणीचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. फुलराणी फुलांनी सजविलेली होती. परीसारखा फ्रॉक परिधान करून मी फीत कापून फुलराणीचे उद्घाटन केले. माझ्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख पाहुणे असलेल्या महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी मला शाबासकी दिली होती. आजोबांच्या वयाची असलेली ही व्यक्ती इतकी महान आहे हे कळण्याचेही माझे वय नव्हते, अशी आठवण शिरवळकर यांनी सांगितली. नंतर अनेक वर्षे ‘फुलराणी’ हीच माझी ओळख झाली होती, असेही त्या म्हणाल्या.

फुलांची बाग आणि बाळगोपाळांचे आवडते प्राणी हे तेव्हाच्या पेशवे उद्यानाचे वैशिष्ट्य होते. आता उद्यानाचे रूपांतर पेशवे ऊर्जा उद्यानामध्ये झाले आहे. फुलराणी बऱ्याचदा बंद असल्याने बालचमूंचा हिरमोड होतो, अशी निरीक्षणे शिरवळकर यांनी नोंदविली. फुलराणीचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस त्या वेळी दोन वर्षांचा असलेला माझा मुलगा सम्राट याच्या उपस्थितीमध्ये झाला होता. नातवंडांना घेऊन आता मी पेशवे उद्यानामध्ये जाते. फुलराणी ही माझी हक्काची गाडी आहे, ही भावना अजूनही माझ्या मनाला उभारी देते, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:04 am

Web Title: fulrani train peshwa garden the center of attraction for children akp 94
Next Stories
1 नियमांचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगीची मागणी
2 पुण्यातला धक्कादायक प्रकार; धावत्या रिक्षात सहप्रवाशी महिलेकडे बघून हस्तमैथुन; आरोपीला अटक
3 प्राधान्यगटांनाच लस!
Just Now!
X