सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थी-प्राध्यापकांसाठीच्या विविध योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद असूनही त्याबाबतचा निधी खर्चच झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे पुरेसा निधी नसल्याने प्रकल्प राबवण्यात अडचणी असल्याचे बोलले जात असताना, दुसरीकडे निधी असूनही खर्च नाही असा प्रकार या निमित्ताने दिसून येत आहे.

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातून योजनांवरील निधी खर्च होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाकडून प्राध्यापक-विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात गरजूंना मदत करण्यासह गुणवत्ता वाढीचाही उद्देश असतो. मात्र, बहुभाषिक संशोधन केंद्र, संशोधन प्रोत्साहन योजना, गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत, विद्यापीठ संशोधन नियतकालिके, इस्रो पुणे विद्यापीठ साहाय्य, विशेष विद्यार्थी सक्षमता केंद्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्गदर्शन अशा काही योजनांसाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूद असूनही २०१९-२०मध्ये एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही.

विद्यापीठाकडून अर्थसंकल्पात या योजनांसाठी पाच लाखांपर्यंतची तरतूद करण्यात आली होती. निधी असूनही खर्च न होण्याचा प्रकार यंदाच नाही, तर गेल्यावर्षीही झाला होता. गेल्यावर्षी या योजनांवरील निधी खर्चाविना पडून राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी असतात. विद्यापीठाच्या योजनांपैकी विशेष विद्यार्थी सक्षमता केंद्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्गदर्शन, गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत या योजना विद्यार्थी हिताच्या असूनही त्यासाठीच्या निधीचा वापर झालेला नाही.

त्याशिवाय औद्योगिक-शासन पुरस्कृत योजनांना अनुरुप अनुदान या योजनेसाठी तर ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सलग दोन वर्षे हा निधी वापरलाच गेलेला नाही.

काही योजनांमध्ये प्रस्तावच सादर केले जात नाहीत, तर काही योजनांसाठी निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता प्रस्तावांकडून होत नाही, असे असू शकेल. मात्र, प्रत्येक विभागात, प्राध्यापक-विद्यार्थ्यांसमोर अर्थसंकल्प असतो. त्यामुळे योजनांबद्दलची जागरुकता होणे आवश्यक आहे. संबंधित योजनांवर का खर्च होत नाही, याचा आढावा वित्त व लेखा समितीकडून घेतला जाईल.

– डॉ. एन. एस. उमराणी, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ