शनिवारवाडय़ाजवळील पेशवेकालीन सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या वाडय़ातील गणेशोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पंचधातूच्या गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पेशवाईतील भांडय़ांचे प्रदर्शन हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.

पेशव्यांच्या दरबारातील सरदार मुजुमदार वाडय़ामध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून ऋषिपंचमीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. सरदार आबासाहेब मुजुमदार देवघरातील पंचधातूच्या गणेशमूर्तीची सोमवारी सकाळी नऊ वाजता  विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ही गणेशमूर्ती दशभुजा आहे. सायंकाळी पुंडलिकबुवा हळबे यांचे कीर्तन झाले. उत्सवाचे यंदा २५३ वे वर्ष असून दररोज सकाळी नऊ वाजता सनईवादन आणि सायंकाळी कीर्तन असे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. वासुदेवबुवा बुरसे, मििलदबुवा बडवे आणि ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे कीर्तन होणार असून शुक्रवारी ऋषिपंचमीला (१४ सप्टेंबर) मोरेश्वरबुवा जोशी-चऱ्होलीकर यांच्या लळिताच्या कीर्तनाने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळात पेशवाईतील भांडी रसिकांना पाहावयास मिळणार आहेत. आबासाहेब मुजुमदार यांचे नातू प्रताप मुजुमदार आणि नातसून अनुपमा मुजुमदार यांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.

सरदार मुजुमदार यांच्याकडील गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या संगीत मैफिली हे एकेकाळच्या पुण्याचे वैभव होते. उस्ताद बडे गुलाम अली, पं. भीमसेन जोशी, उस्ताद फय्याज खाँ, गानहिरा हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, गानसरस्वती किशोरी आमोणकर या कलाकारांच्या येथे मैफिली झाल्या आहेत.