29 September 2020

News Flash

बाजारभेट : कचरा वेचकांचे कोंडलेले श्वास आणि गरूडभरारीचा ध्यास!

या व्यवसायातील मंडळींची दिनचर्या पाहिली की त्यांच्या आयुष्याची स्पष्ट कल्पना आपल्याला येते.

 

पुण्यातील बाजारपेठांमध्ये भ्रमंती करताना, काही ठराविक भागातच व्यवसायाचे केंद्रीकरण झाल्याचे लक्षात येते. मात्र, कागद, काच, पत्रा आणि भंगार गोळा करून ते विकण्याचे व्यवसाय, हे गोरगरीब आणि वंचित उपेक्षितांच्या वस्ती परिसरात केंद्रित झालेले दिसतात. शिक्षणाची कमतरता, निवासाच्या अपुऱ्या सोई, कष्ट करण्याची जिद्द, कमालीचा सोशिकपणा, बहुसंख्य उपेक्षा आणि अपवादानेच कौतुक, मान-सन्मान असेच जीवनमान असणारी मंडळी, शहर स्वच्छतेबरोबरच स्वत:चे प्रपंच चालवताहेत, माणुसकीसाठी संघर्ष करताहेत, शिक्षणाच्या प्रकाशवाटेतून मार्ग शोधत आहेत हीच बाब, अशा व्यावसायिकांशी सुसंवाद साधल्यावर लक्षात आली. अनेक ठिकाणी हा व्यवसाय केंद्रित झालेला असला तरी प्रातिनिधिक स्वरूपात, दांडेकर पूल, विठ्ठल मंदिरामागील, शांतीनगर परिसरात भ्रमंती केली.

शांतीनगर परिसरातील ८० टक्के मंडळी ही भंगार आणि कचरा गोळा करून, त्यावरच उपजीविका करणारी आहेत. वस्तीला लागूनच असलेल्या नाल्याबरोबर येथील जीवनप्रवाह जोडलेला आहे. एक दीड फुटी बोळ, अरुंद रस्ते, जमेल तशी आणि शक्य असेल त्या आकाराची, विनातक्रार उभारलेली घरे! सोयी-सुविधांचा, सहनशक्तीशी असलेला कमालीचा मेळ, यातूनच बेरोजगारीला जवळचा पर्याय म्हणून अनेकांनी स्वेच्छेनेच हा व्यवसाय निवडला आहे. मात्र आपल्या मुलाबाळांनी, मानसन्मानाने जगण्यासाठी शिकलेच पाहिजे, हा अट्टाहास प्रत्येक श्रमिकाचा आहे, ही बाब लक्षणीय वाटते.

या व्यवसायातील मंडळींची दिनचर्या पाहिली की त्यांच्या आयुष्याची स्पष्ट कल्पना आपल्याला येते. सकाळी सहाच्या सुमारास उठून, ठरावीक वस्ती भागात फिरायचे आणि त्या भागातील कचरा गोळा करायचा, त्याचे ओला, सुका असे वर्गीकरण करायचे. जमा झालेला ओला कचरा, मनपाच्या गाडय़ांमध्ये टाकायचा. याच कचऱ्याचे पुढे, खतामध्ये रूपांतर होते, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. कचऱ्यातील कोरडे घटक, मुख्यत: कागद, काच, पत्रा, प्लॅस्टिक आणि इतर वस्तू वेगळ्या करून, भंगार वा रद्दी कागद खरेदी करणाऱ्या दुकानात नेऊन विकणे, हीच या मंडळींची आर्थिक कमाई! सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू होणारा हा खटाटोप दुपारी बारा ते चार या वेळेत उरकला जातो. कचऱ्याच्या प्रतवारीनुसार, माणशी कमाई, सहा ते दहा हजार रुपयांपर्यंत होते. महिला मंडळींना, याव्यतिरिक्त आपापल्या प्रपंचाचा गाडा खेचायचा असतोच! या सर्वाना पुणे मनपातर्फे ढकलगाडय़ा, बकेट, हातमोजे इ. साहित्य विनामूल्य नियमित पुरवले जाते. पुण्यामध्ये अशा व्यावसायिकांच्या वस्त्या मुख्यत्वे दांडेकर पूल, पाटील इस्टेट, वडार वस्ती, जनता वसाहत, रामनगर (वारजे), सुरक्षानगर (येरवडा) आणि तळजाई, पद्मावती, या परिसरात आहेत. त्याव्यतिरिक्त शहरामध्ये किमान पंचवीस वस्त्यांमध्ये हा व्यवसाय छोटय़ा प्रमाणात चालतो. वस्त्यांना जोडूनच अशा मालाच्या खरेदीची, सातशेपेक्षा अधिक दुकाने उभी राहिली असून कचरा विल्हेवाटीच्या यंत्रणेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. शहर आणि उपनगरामध्ये वीस हजारांहून अधिक कुटुंबे या व्यवसायावर गुजराण करीत असल्याची माहिती मिळाली.

कागद, काच, पत्रा पंचायत ही संघटना, व्यावसायिकांच्या उत्कर्षांसाठी त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी, हक्कासाठी, सन्मान मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना ठाम विश्वासातून मूलभूत प्रेरणेतूनच झाल्याचे लक्षात येते. एसएनडीटी कॉलेजमध्ये, प्रौढ शिक्षण विभागाच्या प्रमुख प्रा. पौर्णिमा चिकरमाने यांनी वर्गावर येणाऱ्या अनेक उपेक्षितांचे जीवन जवळून अनुभवले होते. त्यांच्या वाचनामध्ये लॅटिन अमेरिकेतील पावलो फेरर यांचे ‘आपरेस्ट पॅडागोगी’ हे पुस्तक आले, ज्यामध्ये त्यांनी वंचितांचे शिक्षण, कार्यपद्धती, सक्षमीकरण याबाबत अनुभवसिद्ध लेखन तपशिलाने केले आहे. हा प्रत्यक्ष कार्यानुभव तसेच लक्ष्मीनारायणन आणि मोहन ननावरे यांच्या एकत्रित प्रयत्नातून, कार्याची नेमकी दिशा स्पष्ट झाली. महिलांच्या हक्कासाठी तसेच उपेक्षित, वंचितांसाठी कार्यरत असणाऱ्या इतर संघटनांशी संवाद साधला गेला. बाबा आढाव यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले आणि पूर्ण विचारांती निश्चित ध्येयाने, १९९३ मध्ये कागद, काच, पत्रा पंचायतीची स्थापना झाली.

असंघटित असल्याने पूर्वी या व्यावसायिकांना मोकाट जनावरे, पोलीस, प्रशासन यांच्यामुळे कित्येकदा अनाठायी उपद्रव होत होता. शहराची स्वच्छता आणि पर्यावरणाशी संबंधित हा व्यवसाय असल्यामुळे कालांतराने या समाजघटकांची उपयुक्तता, सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनेने नियोजनबद्ध कार्य सुरू केले. त्याची माहिती संस्थेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते विष्णू श्रीमंगले यांनी दिली. श्रीमंगले यांचे शिक्षण एम. ए., एम.फील असून त्यांनी ‘कचरा व्यवस्थापन धोरण, सीमांत समूहाचे राजकारण’ या विषयावर पीएच.डी. केली आहे. संघटनेच्या प्रमुख कार्याबद्दल बोलताना त्यांनी सभासदांना १९९७ साली प्रथमच ओळखपत्र देण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. पुणे मनपा आणि संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत २८०० कार्डधारक सभासद असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षा सुरेखा गोडे, चिटणीस हर्षद बर्डे, खजिनदार मालती गाडगीळ आहेत.

संस्थेचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणून बचतगट आणि कष्टकरी पंचायत नागरी सहकारी पतसंस्थेचा उल्लेख करता येईल. सोपान पवार आणि मंगल गायकवाड हे पतसंस्थेचा कारभार पाहतात. संस्थेचे ऑफिस टिंबर मार्केट येथे असून, वार्षिक उलाढाल दीड कोटीच्या पुढे आहे. बचतगट सभासदांना २ टक्के दरमहा व्याजाने कर्ज दिले जाते.

शासकीय योजनांचा लाभ सभासदांना मिळवून देण्यासाठी संघटना सर्वतोपरी प्रयत्न करते. पुणे मनपा, राज्य शासन आणि केंद्राकडील कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा, प्रशासनाशी सुसंवाद तसेच प्रस्थापित कायद्यांमध्ये, जरूर तेथे सनदशीर लढा देण्याचे कार्य संस्थेतर्फे केले जाते. मुख्यत्वे विमा, आरोग्य आणि शिक्षण यासंबंधी सोयी-सवलती देणारे हे कायदे आहेत. विमा हप्त्यांचा काही बोजा मनपातर्फे उचलला जातो, ही बाब महत्त्वाची वाटते. शिक्षणासाठी विनाव्याज कर्ज, शाळा, महाविद्यालयांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळण्याबाबत मार्गदर्शन, अठरा वयापर्यंतच्या मुलींचे मोफत शिक्षण आणि गुणवान विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ ही इतर कार्ये संस्थेच्या समन्वयातून होत आहेत. कचरा वेचक मंडळी जेथे नियमित माल विकतात, त्या दुकानदारांकडून परस्पर सामंजस्याने दिवाळी बोनस सभासदांना मिळवून देण्याची प्रथा संस्थेच्याच प्रयत्नातून सुरू झाली आहे. अनेक शासकीय योजनांचा लाभ हा फक्त दोन अपत्ये असलेल्या कुटुंबांनाच मिळतो, त्या बाबत धोरणात्मक योग्य निर्णयासाठी सर्व पातळ्यांवर संघटनेचे प्रयत्न चालू आहेत.

प्रातिनिधिक स्वरूपात व्यवसाय आणि वस्तीला भेट म्हणून दांडेकर पुलाजवळील शांतीनगर भागामध्ये संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां शोभा बनसोडे यांच्यासमवेत भ्रमंती केली. या व्यवसायात सुमारे ७० टक्के महिला असल्याचे त्यांनी सांगितले. दारिद्रय़, अज्ञान, अंधश्रद्धा, काहींची व्यसनाधीनता असे अनेक गतिरोधक या कष्टकरी, जिद्दी मंडळींच्या विकासाच्या वाटचालीत आहेत. पन्नाशीच्या शोभाताईंचे घर ओढय़ाच्या पुरात वाहून गेले आणि जेमतेम एक खणाच्या खोलीत त्या तेथेच आता भाडय़ाने राहात आहेत. स्वत:चा प्रपंच आहेच, पण त्या शिवाय समदु:खितांचे जगणे सुसह्य़ व्हावे म्हणून संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. उतार वयात, निराधार आणि निर्धन अशा महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून आरोग्य सेवेची आणि पेन्शनची योजना सुरू व्हावी, असे त्यांना मनापासून वाटते.

पुण्याप्रमाणेच देशभरात अखिल भारतीय कचरा वेचक संघटनेच्या २४ शाखा कार्यरत आहेत. कचरा आणि अडगळीशी निगडित अशा या व्यावसायिकांना पूर्वी मिळणाऱ्या उपेक्षेच्या आणि तुच्छतेच्या नकारात्मक वागणुकीत कालांतराने माणुसकीला पूरक असे बदल होत आहेत. शहरी जीवनात हजारो टनावारी कचऱ्याची सुयोग्य विल्हेवाट लावणे ही अत्यावश्यक सेवा ठरते. हे कार्य करणाऱ्या समाज घटकांना माणुसकीचा सन्मान मिळवून देण्याची इथे धडपड आहे. प्रामाणिक कष्टकऱ्यांना सन्मानाचे जिणे लाभावे यासाठी व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या, चळवळीचे, व्यवसायाचे स्वरूप आता व्यापक व्हावे, ही अपेक्षा आहे.

दारोदारी जाऊन कचरा गोळा करणारी मंडळी आणि रस्त्याने आवाज देऊन भंगार गोळा करणारी माणसे जेव्हा आपल्याला दिसतील तेव्हा या नव्या दृष्टिकोनातून माणुसकीच्या चष्म्यातून त्यांना पाहिले जावे असे वाटते. यापुढे जाऊन त्यांच्या वस्त्या आणि प्रामाणिक कष्टाचे आयुष्यदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न व्हावा असे वाटते. कोंडलेले श्वास आणि गरूडभरारीचे प्रयत्न इथेदेखील प्रत्ययास येतात; अपेक्षा फक्त माणुसकीच्या सन्मानाची आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 2:51 am

Web Title: garbage picker in pune
Next Stories
1 हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारावर प्राणघातक हल्ला
2 पुण्यात आर्थिक विवंचनेतून बाप- लेकीची आत्महत्या
3 मुख्यमंत्र्यांकडे कपिल शर्माच्या ट्विटसाठी सवड, पण कचरा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही – सुप्रिया सुळे
Just Now!
X